पुणे- आम आदमी पक्षात दिल्लीत झालेल्या सावळ्या गोंधळानंतर आता त्याचे देशभर पडसाद उमटू लागले आहेत. पक्षातील वरिष्ठ नेते प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर
आपमधील अनेक नेते नाराज आहेत. महाराष्ट्र आम आदमी पक्षातही मोठी नाराजी आहे. आम आदमी पक्षाचे पुणे जिल्ह्याचे संयोजक
मारूती भापकर यांनी आज पुण्यात सायंकाळी एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीनंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या बैठकीला राज्यभरातून आपमधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर राज्यातील प्रमुख 50 पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते आम आदमी पक्षाला राम राम ठोकणार असल्याचे कळते आहे. मारूती भापकर यांनीही तसे संकेत दिले आहेत.
अण्णा आंदोलनानंतर जनसामान्यांचा पक्ष म्हणून ख्याती मिळवलेल्या आम आदमी पक्षात मागील महिन्यापासून जोरदार यादवी सुरु आहे. पक्षाचे प्रमुख अरविंद
केजरीवाल यांनी योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांच्यासह पक्षाचे अंतर्गत लोकपाल अॅडमिरल रामदास यांची एकतर्फी हकालपट्टी केल्यानंतर केल्यानंतर देशभरातील पक्षातील कार्यकर्ते दुखावले आहेत. यादव-भूषण यांच्यावर एकतर्फी कारवाई केल्याचे आपच्या अनेक कार्यकर्त्यांचे मत बनत चालले आहे. महाराष्ट्रातील आम आदमी पक्षातील बहुतांश कार्यकर्त्यांचीही तीच भावना बळावत चालली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक आप नेते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा विचार करीत आहेत. अंजली दमानिया यांनी आपल्या सर्व पदाचे राजीनामे दिले आहेत तर मेधा पाटकर यांनी पक्षाच्या पक्षसदस्याचा राजीनामा दिला आहे.
मयांक गांधी, प्रा. सुभाष वारे, आभा मुळे, मीना कर्णिक, मीरा संन्याल, सुभाष लोमटे, फारुख अहमद, मारूती भापकर यांच्यासह अनेक नेते नाराज असल्याचे कळते आहे. याच पार्श्वभूमीवर मारूती भापकर यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यातील 150 ते 200 पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आज सायंकाळी पुण्यात बैठक होत आहे. पक्षाला राम राम ठोकायचा का? या एकाच मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे समजते आहे. या बाबत आजच्या बैठकीत एकमत झाल्यास प्रमुख नेत्यांसह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची घोषणा बैठकीनंतर करणार असल्याचे पुढे येत आहे.
अरविंद केजरीवाल यांच्याकडे आपचे संयोजकपद आहे. या पदाच्या जोरावर
केजरीवाल व त्यांच्या समर्थकांनी योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर या दोघांना शिस्तपालन समितीतूनही डच्चू देण्यात आला आहे. पक्षाचे अंतर्गत लोकपाल अॅडमिरल (निवृत्त) एल. रामदास यांचीही कोणतेही कारण न देता पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे देशभरासह राज्यातील कार्यकर्त्यांत नाराजी आहे. राज्य कार्यकारिणीतील अनेक नेते योगेंद्र यादव यांच्या पाठीशी आहेत.
जनआंदोलन व समाजवादी विचार मांडत यादव यांनी अनेक सामाजिक कार्यात, आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. त्यांच्याशी संबंधित अनेक लोक आपमध्ये गेली आहेत. मात्र, त्यांच्यावर केल्या गेलेल्या एकतर्फी कारवाईमुळे ते दुखावले आहेत. केजरीवाल यांची संपूर्ण पक्षावर एकहाती सत्ता असतानाही राज्यातील अनेक नेते यादवांच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील केजरीवाल गट अस्वस्थ झाला आहे. जनआंदोलनातील नेते यादव यांच्यामुळे आपमध्ये आल्याचे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे हे सर्व नेते यादवांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे कळते.
पुढे वाचा, सुभाष वारे काय घेणार निर्णय...