आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येरे येरे पावसा: मान्सून लांबला,पेरण्यांची घाई टाळा, हवामान खात्याचा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- नैऋत्य मोसमी पावसाचे राज्यात अद्याप आगमन झालेले नाही. सध्या तुरळक ठिकाणी पडणारा पाऊस हा पेरणी करण्यास योग्य नाही. जोपर्यंत हवामान विभाग अधिकृतरीत्या मान्सूनच्या आगमनाची घोषणा करत नाही, तोवर शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला. दरम्यान मान्सूनच्या अरबी समुद्राकडील स्थिती जैसे थे असून, पावसासाठी ती अनुकूल नसल्याचेही आयएमडीने स्पष्ट केले आहे.

आयएमडीचे कृषी हवामान विभागप्रमुख डॉ. एन. चटोपाध्याय म्हणाले,‘मान्सून दक्षिणेकडील भागात थबकला आहे. पुढील वाटचालीस सध्या अनुकूल स्थिती नाही. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत. विशेषत: मराठवाडा, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पेरण्या झाल्याचे वृत्त आहे. पाऊस राज्यात दाखल झालेलाच नाही. त्यामुळे या पेरण्या वाया जाण्याचा धोका आहे. आयएमडीने अधिकृत घोषणा केल्याशिवाय पेरण्या करू नयेत.

७ जुलैपर्यंत घेता येतील सर्व पिके : काही जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. मात्र पेरणी करताना ७५ ते १०० मिमी (३ ते ४ इंच) पाऊस झाला की नाही हे लक्षात घ्या.

७ जुलैपर्यंत सर्व खरीप पिकांची पेरणी करता येते. सात जुलैनंतर पाऊस झाल्यास मूग, उडीद टाळा. ही दोन्ही पिके घ्यायची तर कापूस, सोयाबीनमध्ये आंतरपीक घ्या. कमी कालावधीत तयार होणारे व पाण्याचा ताण सहन करणारे वाण निवडा, असे विस्तार कृषी विद्यावेत्ता डाॅ. एस.बी. पवार म्हणाले.

पावसानुसार अशी करा पिकांची निवड
१५ जून ते ७ जुलै दरम्यानचा पाऊस : सर्व खरीप पिके

८ ते १५ जुलै दरम्यान पाऊस
घ्यायची पिके : कापूस, संकरित ज्वारी, सं.बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सूर्यफूल
न घ्यायची पिके : भुईमूग, उडीद, मूग

१६ ते ३१ जुलै दरम्यान पाऊस
घ्यायची पिके : सं.बाजरी, सूर्यफूल, तूर + सोयाबीन, बाजरी+तूर, एरंडी + तूर
न घ्यायची पिके : कापूस, सं. ज्वारी, भुईमूग

पूर्वमोसमीचा फक्त ओलावाच
स्थानिक कारणांमुळे ज्या भागात - विशेषत: मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे, त्या पावसाने जमिनीवर तात्पुरता ओलावा आला आहे. तो झिरपलेला नाही. वरवरचा आहे. त्या ओलाव्याचा बियाणे रुजण्यासाठी उपयोग होणार नाही. उलट सुरुवातीच्या या वाफशाने बियाणे जळून धोका आहे. त्यामुळे सोयाबीन, डाळी, कापूस अशी बियाणे पेरू नयेत.
- डॉ. एन. चटोपाध्याय, प्रमुख, आयएमडी