आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Western Maharashtra Ground Report: Challenge Before Modi Wave To Convert Into Vote

पश्चिम महाराष्ट्राचा ग्राउंड रिपोर्ट: मोदी लाट मतपेटीत नेण्याचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धडाकेबाज सभांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण ‘मोदी’मय झाले आहे. असे असले तरी ब-याच मतदारसंघांत भाजपकडे स्वत:ची व्होट बँक असलेले उमेदवार नाहीत. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रमुख उमेदवारांनी आपत्ती व्यवस्थापनाची जोरदार तयारी केली आहे. सोलापूर जिल्ह्यात सद्य:स्थितीत राष्ट्रवादीच आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर ‘एमआयएम’मुळे सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. पुणे जिल्ह्यात शरद पवार यांना शह देण्यासाठी शिवसेना आणि भाजपने जोरदार फील्डिंग लावली आहे. सातारा जिल्ह्यात मात्र ‘राजें’चाच प्रभाव जाणवतो.
* सोलापूर ११ जागा
जिल्ह्यात घड्याळाचीच राहील टिकटिक
जात, गटातटाचे राजकारण आणि संपुष्टात आलेली युती, आघाडी यामुळे अनेक मतदारांमध्ये संभ्रमावस्था आहे. सांगोल्यातून राष्ट्रवादीने उमेदवारच न दिल्याने शेकापचे गणपतराव देशमुख यांचा मार्ग सोपा झाला आहे. भाजपचे श्रीकांत देशमुख यांना मोदी लाटेचा फायदा होईल की नाही, याबाबत शंका आहे. मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार लक्ष्मण ढोबळे यांना उमेदवारी नाकरल्याने ते अपक्ष लढत आहेत. येथे ढोबळेंचे पारडे जड वाटत आहे. अक्कलकोटमधून विद्यमान भाजप आमदार सिद्रामप्पा पाटील व काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे यांच्यातच खरी लढत आहे. येथे भाजप उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. माढ्यातून बबन शिंदे, करमाळ्यातून रश्मी बागल तसेच खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा एकहाती कारभार असणा-या माळशिरसमधून हणमंत डोळस हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील अशी शक्यता आहे. बार्शीचे अपक्ष उमेदवार दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांची ताकद वाढली आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या राजेंद्र राऊत यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. पंढरपुरात भारत भालके, प्रशांत परिचारक यांच्या लढतीत दलित आणि धनगर समाजाच्या निर्णायक मतांमुळे परिचारकांना संधी आहे. करमाळ्यात बागल, संजय शिंदे, नारायण पाटील यांच्यात तिरंगी लढत असून येथेही विद्यमान आमदार श्यामल बागल यांच्या कन्या रश्मी यांना पसंती मिळत आहे. सोलापूर शहर मध्यमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती काँग्रेसकडून उभ्या आहेत. येथे एमआयएमही रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले महेश कोठे, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम आणि भाजपच्या मोहिनी पतकी अशी लढत मध्यमध्ये आहे. दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांची बाजू बळकट असली तरी भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख आणि शिवसेनेचे गणेश वानकर, मनसेचे युवराज चुंबळकर यांनी माने यांना हैराण केले आहे. सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे पारडे जड आहे.
* पुणे २१ जागा
राष्ट्रवादीला भाजप-सेनेचे कडवे आव्हान
पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या पुणे जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा घेऊन भाजपने मुसंडी मारण्याचा प्रयत्न चालवला आहे. तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत तोंडसुख घेण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही.
अजित पवारांचा मार्ग सोपा वाटत असला तरी दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील यांना जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते आहे. विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव मतदारसंघातून त्यांचेच एकेकाळचे सहकारी अरुण गिरे (शिवसेना) यांनी आव्हान निर्माण केले आहे. ही निवडणूक खासदार आढळराव पाटील विरुद्ध वळसे-पाटील यांच्यातच होत असल्याचे चित्र आहे. पुणे शहरातील भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे रोहित टिळक यांच्यातील लढतही बहुरंगी राजकारणामुळे अनिश्चिततेची बनली आहे. मतविभागणीत राष्ट्रवादी आणि शिवसेना व मनसे यांच्यात कोण वरचढ ठरणार यावरच तेथील निकाल अवलंबून आहे. तरीही तेथील नागरिकांना बापट यांचे पारडे जड वाटते आहे. बारामती मतदारसंघात अजित पवारांनी केलेल्या विकास कामांचा मोठा गाजावाजा केला जातो आहे, पण मोदी लाटेने वातावरण बदलणार का, याची उत्सुकता आहे.
अशा होतील काही प्रमुख लढती
बारामती : अजित पवार (राष्ट्रवादी), बाळासाहेब गावडे (भाजप), इंदापूर : हर्षवर्धन पाटील (काँग्रेस), दत्तात्रय भारणे (राष्ट्रवादी), आंबेगाव : दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी), अरुण गिरे (शिवसेना), पुणे कसबा : गिरीश बापट (भाजप), रोहित टिळक (काँग्रेस), भोर : संग्राम थोपटे (काँग्रेस), शरद ढमाले (भाजप), विक्रम सुरवाड (राष्ट्रवादी), जुन्नर : अतुल बेणके (राष्ट्रवादी), आशाताई बुचके (शिवसेना), गणपत फुलवडे (काँग्रेस), शिरूर : बाबुराव पाचर्णे (भाजप), अशोक पवार (राष्ट्रवादी), कमलाकर सातव (काँग्रेस), दौंड : राहुल कुल (रासप), आत्माराम ताकवाने (काँग्रेस), रमेश थोरात (राष्ट्रवादी), पुरंदर : संजय जगताप (काँग्रेस), अशोक टेकवडे (राष्ट्रवादी), संगीतादेवी राजेनिंबाळकर (भाजप), संजय शिवतरे (सेना).

* कोल्हापूर १0 जागा
शिवसेनेची कडवी टक्कर, मोदी लाटेमुळे सतेज पाटील अडचणीत
कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघात मोदींची सभा झाली. येथे माजी गृहराज्यमंत्री, काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील विरुद्ध भाजपचे अमल महाडिक अशी मुख्य लढत आहे. आता मोदी लाट चमत्कार करेल का, याची उत्सुकता आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसारगर आणि काँग्रेसचे सत्यजित कदम यांच्यातच मुख्य लढत आहे, तर कागलमध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे संजय घाटगे यांच्यात घमासान आहे. करवीर मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रदीप नरके आणि काँग्रेसचे पी. एन. पाटील अशी मुख्य लढत आहे. इचलकरंजीत भाजपचे सुरेश हाळवणकर आणि काँग्रेसचे उमेदवार प्रकाश आवाडे यांच्यामध्ये लढत दिसते. शिवसेनेच्या उमेदवारामुळे हाळवणकर यांना फटका बसण्याची शक्यता आहे. शिरोळमध्ये काँग्रेसचे आमदार सा.रे. पाटील यांच्याविरुद्ध स्वाभिमानीचे सावकार मादनाईक आणि शिवसेनेचे उल्हास पाटील, राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील यड्रावकर अशी चौरंगी लढत दिसते. राधानगरीचे राष्ट्रवादीचे के. पी. पाटील यांच्याविरुद्ध शिवसेनेचे प्रकाश आबीटकर यांना चांगला प्रतिसाद मिळतोय. चंदगडमध्येही राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर विरुद्ध सेनेचे नरसिंगराव पाटील, जनसुराज्यचे संग्रामसिंह कुपेकर, स्वाभिमानीचे राजेंद्र गड्यानवर, काँग्रेसचे भरमूअण्णा पाटील अशी पंचरंगी लढत दिसते. शिवसेना किंवा स्वाभिमानीचा उमेदवार पुढे जाईल, अशी चिन्हे आहेत. शाहूवाडीत विनय कोरे यांच्याविरुद्ध सेनेच्या सत्यजित पाटील, काँग्रेसच्या गायकवाड यांनाही प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे कोरेंसारखा दिग्गज नेतादेखील चिंतेत आहे.
* सातारा ०८ जागा
उदयनराजे भोसलेंचाच प्रभाव, पृथ्वीराजांना आव्हान कायम
महाराज ज्या पक्षात त्या पक्षाच्या पाठीशी प्रजा असे समीकरण येथे आहे.त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील वर्चस्व या वेळीही कायम राहील असेच चित्र आहे. मुख्यमंत्र्यांच्या या जिल्ह्यात काँग्रेसला दोन-एक जागांवर समाधान मानावे लागेल. भाजप, सेनेचा तेथे निभाव लागणे कठीण दिसत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्यातील जनतेवर प्रभाव टाकला जात असताना महाराजांच्या वंशजांच्या सातारा जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीचा बोलबाला आहे. सातारा शहर परिसरात ऐतिहासिक स्थळांमुळे पर्यटनासाठी मोठा वाव असूनही तेथील नगरपालिकेला म्हणावा तसा विकास करता आला नाही. उद्योग, व्यवसायाकडेही लक्ष दिले गेले नाही, याबद्दल नवमतदारांमध्ये नाराजी दिसते. तरीही साता-यातील लढती एकतर्फीच होतील असे दिसते. शहरातून शिवेंद्रराजे भोसले यांचा विजय जवळपास निश्चित आहे. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेने मुंबईहून दगडू सपकाळांना पाठवले आहे. वाईमधून मकरंद पाटील, कोरेगावातून शशिकांत शिंदे यांच्याही बाजूने वातावरण दिसते आहे. काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे विलास उंडाळकर यांनी तगडे आव्हान निर्माण केले आहे. माणमधून काँग्रेसचे जयकुमार गोरे यांनाही संघर्ष करावा लागत आहे. उत्तरेतून उंडाळकर, दक्षिणेतून पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देऊन किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्या रिक्त होणा-या विधान परिषदेच्या जागी संधी देऊन उंडाळकर यांची समजूत काढता आली असती. मात्र तशा प्रकारचा समजुतदारपणा का दाखविण्यात आला नाही, याची चर्चा रंगली आहे.
सांगली ०८ जागा
आर. आर. आबांची तासगावची जागा मोदी लाटेमुळे धोक्यात
मोदींच्या सभेचा भाजपचे उमेदवार अजित घोरपडे यांना फायदा होईल. आर.आर. पाटील यांनी स्थानिक आघाड्या सक्रिय केल्या आहेत. मिरजमध्ये भाजप उमेदवार आमदार सुरेश खाडे यांची बाजू भक्कम आहे. काँग्रेसचे सिद्धार्थ जाधव, शिवसेनेचे तानाजी सातपुते यांना जुळवाजुळव करताना नाकी नऊ आले आहेत. जतमध्ये भाजप उमेदवार विलास जगताप यांना मानणारा एक वर्ग आहे. मोदी सभेमुळे राष्ट्रवादीचे प्रकाश शेंडगे, शिवसेनेचे संगप्पा तेली, काँग्रेसचे विक्रम सावंत आदी मंडळींना संघर्ष करावा लागत आहे. पलूस-कडेगावमध्ये पतंगराव कदम यांचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजप उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांना स्वाभिमानीच्या बंडखोर उमेदवारामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. शिराळ्यात राष्ट्रवादीचे मानसिंग नाईक, भाजपचे शिवाजी नाईक यांच्यात घमासान आहे. मोदी लाट आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या नाईकांची बाजू कमकुवत झाली आहे. आटपाडीमध्ये काँग्रेसचे सदाशिवराव पाटील, शिवसेनेचे अनिल बाबर, भाजप-रासप युतीचे गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे अमरसिंह देशमुख अशी चौरंगी लढत आहे. इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात एकच तगडा उमेदवार देण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रयत्न फसला. पाटील यांचा विजय निश्चित दिसत असला तरी ते सावध दिसत आहेत. सांगलीचे भाजप उमेदवार सुधीर गाडगीळ यांना अद्यापही स्वत:ची तगडी प्रचारयंत्रणा उभारता आलेली नाही. याउलट काँग्रेसचे मदन पाटील, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत.
पुढे पाहा पश्चिम महाराष्ट्राचे राजकीय चित्र