आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसली आलीये असहिष्णुता, नाना पाटेकर यांचा परखड सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे -‘कसली आलीये असहिष्णुता? हा देश माझा आहे आणि इथले लोक माझे आहेत. ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करीन. उगाच बोंबलत फिरणार नाही,’ असे परखड मत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्यात सुरू असलेल्या असहिष्णुतेच्या वादावर मंगळवारी व्यक्त केले.

ज्येष्ठ अभिनेते डाॅ. श्रीराम लागू यांची भेट घेण्यासाठी पुण्यात अाल्यानंतर नाना पत्रकारांशी बाेलत हाेते. वि. वा. शिरवाडकरांच्या लेखणीतून उतरलेले ‘नटसम्राट’ आणि त्यातील अप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तिरेखा आपल्या अभिनयाने अजरामर केलेले डॉ. श्रीराम लागू तीच व्यक्तिरेखा चित्रपटात साकारलेल्या नाना पाटेकरांच्या स्वागताला आवर्जून आले होते. दोन रंगकर्मींची ही भेट उपस्थितांसाठी एक दुर्मिळ अनुभव बनली.
मोकळ्याढाकळ्या स्वभावाच्या नानाने डॉ. लागूंच्या घरी प्रवेश करताच स्वागताला समोर येणाऱ्या लागूंचा चरणस्पर्श केला आणि मग दोघांनीही परस्परांना स्नेहाची मिठी मारली. नानाच्या खांद्यावर थोपटत लागूंनी विचारपूस केली. नानासोबत दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर हेही उपस्थित होते. मांजरेकर म्हणाले,‘चित्रपट माध्यमात वेगळे प्रयोग करता येतात. नाटकाच्या तुलनेत अधिक शक्यता धुंडाळता येतात. चित्रपटात विक्रम गोखलेंची व्यक्तिरेखा या शोधातूनच आली आहे.’
‘तू अाधी पाया पडणार, मग शिव्या घालणार’
‘डॉक्टर, एक जानेवारीला तुम्ही चित्रपट पाहायला यायचे आहे, मी निमंत्रण द्यायला आलोय,’ असे नानाने सांगताच ‘तू लेका, आधी पाया पडणार आणि मग शिव्या घालणार,’ असा शेलका आहेर देत डॉ. लागूंनी नानाची फिरकी घेतली. ‘डॉक्टरांचा आणि दत्ता भटांचा ‘नटसम्राट’ मी कित्येक वेळा पाहिलाय. अशी ताकदीची भूमिका हे नट सातत्याने कशी काय पेलत असतील, असा प्रश्न मला नेहमी पडत असे’, असे नाना म्हणाला.
इतिहासाशी प्रतारणा नकाे
‘चित्रपट हे कला माध्यम आहे आणि कलाविष्काराचे स्वातंत्र्य त्यामध्ये घेता येते. पण याचा अर्थ असा नव्हे की, इतिहासाशी प्रतारणा करावी. ऐतिहासिक घटना, व्यक्ती, काळ यांच्याशी संबंधित चित्रपट असेल तर मूळ इतिहासाशी प्रामाणिक राहिले पाहिजे. प्रतारणा करता कामा नये, हे भान संजय लीला भन्साळीने ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट करताना ठेवायला हवे होते. जे इतिहासात नाही ते चित्रपटात कसे येऊ शकते?’ असा सवाल नानांनी या चित्रपटाबद्दल निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केला.
तुलना करण्यास भीत नाही
‘नटसम्राट’ चित्रपटात तुमची डाॅ. लागूंशी तुलना हाेईल असे वाटते का?’ या पत्रकारांच्या प्रश्नावर नाना म्हणाले, ‘मी तुलनेला भीत नाही. पराभव झाला तर कोणाकडून होणार आणि समजा झाला तर बिघडले काय?’ असा प्रतिप्रश्नच त्यांनी केला. ‘नटसम्राटमधील शिरवाडकरांची भाषा, आरोह-अवरोह पेलणे अवघड आहे. हे नाटक रक्त शोषून घेते. एका बाजूला ते जगण्याची आस निर्माण करते आणि त्याच वेळी मारतही राहते. पण चित्रपटात ही भूमिका केल्याने छान वाटते आहे. आता यापुढे मी काही केले नाही तरी चालेल, अशी मानसिकता तयार झाली आहे’, असेही ते म्हणाले.