आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यसंमेलन अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू होते न होते, तोच आता नाट्यसंमेलन अध्यक्षपदासाठीही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नाट्यवर्तुळात आणि रंगकर्मींमध्ये या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे अंक रंगत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (26 सप्टेंबर) नाट्य परिषदेची बैठक होणार आहे.
नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने अध्यक्षपदासाठीच्या प्रक्रियेसंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. परिषदेच्या घटनेनुसार सर्व शाखांना अध्यक्षपदासाठी नावे सुचवता येतात आणि ती मध्यवर्ती शाखेकडे पाठवता येतात. त्यानुसार नावे सुचवावीत, अशी पत्रे मध्यवर्तीकडून यापूर्वीच रवाना झाली आहेत. आता कुणाची नावे सुचवली जातात, याकडे रंगकर्मींचे लक्ष लागले आहे.


डॉ. पटेल यांचे नाव आघाडीवर
गेल्या दोन वर्षांपासून ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. या वेळीही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. डॉ. पटेल मूळचे सोलापूरचे असल्याने तेथील शाखेकडूनही त्यांचे नाव आघाडीवर आहे. पुणे शाखेकडून संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री-गायिका कीर्ती शिलेदार, ज्येष्ठ नाट्यव्यवस्थापक मनोहर कुलकर्णी तसेच नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे यांच्याही नावांची चर्चा सुरू आहे. विद्यमान अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे हे पुण्याचे असल्याने पुन्हा संमेलनाध्यक्षपद पुण्याकडेच येईल का, अशीही विचारणा सुरू आहे.


सर्व पर्यायांचा विचार
नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कुणाचे नाव सुचवायचे, याविषयी गुरुवारी होणा-या बैठकीतच निर्णय घेतला जाईल. सर्व नावांच्या पर्यायांचा विचार केला जाईल आणि सर्वानुमते एक नाव मध्यवर्ती शाखेला सुचवले जाईल.
- सुरेश देशमुख - अध्यक्ष, नाट्यपरिषद, पुणे.