आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जूनअखेरीस पारा चढलेलाच, नांदेडमध्ये सर्वाधिक तापमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मान्सूनची वाटचाल होण्याच्या दृष्टीने राज्यात कुठलीही प्रगती नसल्याने तसेच कोरड्या हवामानामुळे मराठवाडा, विदर्भात तापमानाचा पारा पुन्हा चढला आहे. जूनच्या पहिल्या वीस दिवसांत साधारणपणे 34 ते 35 अंशांच्या दरम्यान असलेले तापमान गेल्या तीन दिवसांपासून चाळिशीच्या घरात पोहोचले आहे. यात मराठवाड्यात नांदेडमध्ये रविवारी राज्यातील सर्वाधिक 40.50 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

हवेतील आद्र्रता शोषली गेल्याने तापमान चढे असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागातील सूत्रांनी दिली. येत्या 48 तासांत हीच परिस्थिती कायम राहील, असेही आयएमडीने म्हटले आहे. मान्सूनचे आगमन लांबल्याने जून संपत आला तरी घामाच्या धारा कायम असल्याचे चित्र मराठवाडा, विदर्भात कायम आहे. त्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र, कोकणात हवामान ढगाळ आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाऊस नसला तरी हवेतील आद्र्रता टिकून आहे.

मराठवाड्यात गेले काही दिवस कोरडे हवामान आहे. उष्णतेची लाट गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशात कायम आहे. तेथून येणारे वारे कोरडे असल्याने हवेतील आद्र्रता ते शोषून घेत आहेत. परिणामी उकाड्यात आणि तापमानातही वाढ होत आहे, असे आयएमडीने म्हटले आहे. येत्या दोन दिवसांत हवामानात कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही, असा अंदाज आहे. यामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता असून जुलै महिन्यांत मात्र ही परिस्थिती बदलू शकते.

देशभरात सरासरीपेक्षा 42 टक्के कमी पाऊस
देशात जून महिन्यात पडणार्‍या पावसाच्या तुलनेत यंदा 42 टक्के कमी पाऊस झाला आहे. गेल्या 113 वर्षांत एवढा कमी पाऊस होण्याची ही बारावी वेळ आहे. गुजरात आणि राजस्थान या राज्यांत तर परिस्थिती अधिकच भीषण आहे. येथे यंदा जूनमध्ये 80 टक्के कमी पाऊस झाला आहे. एका खासगी संस्थेने हवामानाचा अंदाज व्यक्त करताना ही आकडेवारी जाहीर केली आहे.

जुलैमध्ये थोडा दिलासा मिळण्याची शक्यता
जुलैमध्ये पाऊस पडून थोडा दिलासा मिळेल, असे या अंदाजात नमूद आहे. या महिन्यात देशभरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होईल. विशेषत: दिल्ली आणि ईशान्येतील राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे या संस्थेने नमूद केले आहे.
(डेमो पिक)