आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजितदादांच्या मोदींना शुभेच्छा अन‌् काही सवाल; फेसबुक लाइव्हवर अनेक प्रश्नांना उत्तरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सुमारे २० मिनिटे जनतेशी संवाद साधला. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देत पवारांनी संवादाची सुरुवात केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत ‘हेच का अच्छे दिन’ असा सवालही केला.  

‘शेतकरी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा सुरू केली. विधिमंडळातही भूमिका घेतली. शेतकऱ्यांनीही यासाठी सकारात्मक भूमिका बजावली. त्यामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला. मात्र अजूनही कर्जमाफी मिळाली नाही. फॉर्म भरण्यातच वेळ चालला आहे,’ असे पवार म्हणाले.  सव्वादोन मिनिटांच्या निवेदनानंतर फेसबुक लाइव्हवर प्रेक्षकांच्या ‘कॉमेंट्स’ सुरू झाल्या. त्यातल्या निवडक प्रश्नांना पवारांनी उत्तरे दिली. महागाईच्या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘भारतात पेट्रोल-डिझेल सगळ्यात महाग अाहे. ‘अच्छे दिन’ आले असे सांगायचे व गॅस, पेट्रोलच्या किमती वाढवायच्या. जगात बॅरलचे दर कमी असतानाही आपल्याकडे महागाई वाढतच आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही आणि महागाई मात्र वाढली आहे. हेच का यांचे अच्छे दिन याचा विचार करण्याची वेळ आली आहे.’  

ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घालण्याच्या मागणीवर ते म्हणाले, ग्रामपंचायतीमध्ये पक्षीय राजकारण चालत नाही. तरुणांनीच एकत्र येऊन निवडून येण्याचा विश्वास दिला पाहिजे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवड स्थानिक वादामुळे रखडली असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर पवारांनी ‘लवकरच तोडगा काढतो’ असा शब्द दिला.  
 
 
अाैरंगाबादेत पक्ष ठप्प  
औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष ठप्प असल्याची तक्रार एकाने अजितदादांकडे केली. त्यावर ते  म्हणाले, “कठोर निर्णय घ्यायची वेळ आली आहे. तो लवकरच घेतला जाईल.’  
 
दादांना वाढते लाईक्स
फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा अजित पवारांचा प्रयत्न चांगलाच यशस्वी झाला. पहिल्या नऊ तासांतच त्यांना जगभरातून २ लाख ७४ हजार ‘व्ह्यूज’ मिळाले. यात सर्वाधिक व्ह्यूज अर्थातच महाराष्ट्रातून होते. तब्बल २२ हजारांपेक्षा अधिक लोकांनी ‘कॉमेंट्स’ करत पवारांशी संवाद साधला. यात तरुणांची संख्या जास्त होती. फेसबुक लाइव्ह संवादाला २९ हजारांपेक्षा जास्त ‘लाइक्स’ही मिळाल्या.
बातम्या आणखी आहेत...