आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारीशक्ती - नौदलात लवकरच येणार महिला पायलट : अॅडमिरल धवन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नौदलात महिला अधिकारी विविध पदांवर अनेक वर्षांपासून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असून त्याचा आपणास अभिमान आहे. नौदलात त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण असून पुरुषांच्या बरोबरीने त्या आपली जबाबदारी सांभाळत आहेत. नौदलात कोणताही लिंग भेदाभेदाचा प्रकार नसून सागरी सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्यासाठी महिला पायलटला मान्यता द्यावी, असा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती नौदलप्रमुख अॅडमिरल आर.के.धवन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

धवन म्हणाले, भारताला मोठ्या प्रमाणात सागरी सीमा असून त्याचे संरक्षण करणे व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी नौदल सदैव कार्यरत आहे. सागरी सुरक्षेसाठी नौदल व तटरक्षक दलाला मिळून ८७ ऑटोमॅटिक सिस्टिम सेंटर, ५१ तटरक्षक दल तळ, ४६ कोस्टल रडार कार्यान्वित करण्यात आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याआधारे सागरी सुरक्षा करण्यावर भर दिला जात आहे. देशभरात किनारी भागात चार लाख मच्छीमार असून त्यांच्यात सागरी सुरक्षेबाबत जागृती केली जात आहे. तसेच स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ४७ जहाजे व पाणबुड्यांची बांधणी करण्यात येत आहे. सागरी सुरक्षेबाबत विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने डीआडीओच्या मदतीने सेन्सॉर टेक्नॉलॉजीवर आधारित पुढील ३० वर्षांचा आराखडा आखला असून स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित तंत्रज्ञान विकासाचा पुढील १५ वर्षांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
आंतरराष्ट्रीय नौदल सराव भारतात
नौदलप्रमुख धवन म्हणाले, भारतीय नौदलातर्फे ४ ते ८ फेब्रुवारी २०१६ दरम्यान विशाखापट्टणम येथील रामकृष्ण बीच या ठिकाणी इंटरनॅशनल फ्लिट रिव्ह्यू-२१०६ या नौदल सरावाचे आयोजन करण्‍यात आले आहे. यात जगातील ४७ देशांचे नौदल सहभागी होणार आहेत. असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील नौदल सराव व प्रदर्शन या ठिकाणी होईल. भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल.
दाट धुक्यात पासिंग परेड
पुणे - पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत आणि दाट धुक्याच्या वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १२९ व्या तुकडीची उत्साहात पासिंग आऊट परेड शनिवारी पार पडली. सुमधुर लष्करी बँडच्या संगीतात कॅडेट्सने नौदलप्रमुख अॅडमिरल आर.के.धवन यांना मानवंदना देऊन शिस्तबद्ध संचलन करत सर्वांचे लक्ष्य वेधले.
याप्रसंगी ब्रिगेडियर एस.के.राव, एनडीएचे प्राचार्य प्रा. ओ. पी.शुक्ला, ब्रिगेडियर पी.बी.जेकब, मेजर बी.डी.शुक्ला उपस्थित होते. नौदलप्रमुख यांच्या हस्ते राष्ट्रपती सुवर्णपदक कॅडेट पी.के.मोहंती, रजत, अभिषेक कुंडलिया,कांस्यपदक अनमोल रावतला प्रदान करण्यात आले.
कॅडेट्सना मार्गदर्शन करताना नौदलप्रमुख धवन म्हणाले, एनडीए ही जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था असून त्यामध्ये आतापर्यंत ३३ हजार कॅडेट्सना उत्तम पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. बांधिलकी, धाडस, क्षमता, निष्ठा, सचोटी या गुणांच्या आधारे हे कॅडेट्स देशाच्या संरक्षणासाठी बलिदान करण्यासही सदैव तत्पर असतात. अकॅडमी ही शारीरिकदृष्ट्या कॅडेट्सला सक्षम बनवत असते. मात्र, त्यापुढील सेवेच्या काळात आपली विश्वासार्हता टिकवून ठेवणे महत्त्वपूर्ण आहे. कॅडेट्सच्या पालकांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत असल्याने कुटुंबीयांना व देशाला त्यांचा अभिमान आहे. आपले ध्येय नेहमी मोठे ठेवून त्यादृष्टीने सर्वोत्तम परिश्रम करणे गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी या वेळी कॅडेट्सला दिला.