आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ लेखिका शिरीष पै यांचे निधन; अकृत्रिम जिव्हाळ्याचे स्थान हरवले, साहित्यिकांची श्रद्धांजली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कथा, कविता, ललित लेखन, नाटक, बालसाहित्य अशा साहित्याच्या  विविध प्रांतांत मुशाफिरी केलेल्या  ज्येष्ठ  लेखिका, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या  कार्यकर्त्या  शिरीष पै (८८) यांचे  शनिवारी मुंबईत निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.  प्रसिद्ध लेखक साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या  त्या कन्या होत. शिरीष पै यांच्या पार्थिवावर सायंकाळी साडेसात वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुलगे तसेच भगिनी मीना देशपांडे आहेत. 

शिरीष पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. वडील आचार्य अत्रे यांच्याकडूनच त्यांच्यावर वाचनाचे, लेखनाचे संस्कार झाले. काही काळ त्यांनी घरच्या ‘मराठा’ या वृत्तपत्रात पत्रकारिताही केली. अत्रे यांच्या  घरी राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा कायम राबता असल्याने शिरीष पै यांच्यावरही त्या वातावरणाचा आपसूक प्रभाव पडला. त्यातून त्यांच्यातील  लेखिकेला  विकसित होण्याची  संधी मिळाली. अत्रे हे ‘विनोदकार’ म्हणून विख्यात असले तरी शिरीष यांची लेखनशैली  स्वतंत्र ठसा घेऊन आली. त्यांच्या  ललित लेखनात आणि नंतर त्यांनी मराठी भाषेत रुजवलेला आणि रुळवलेल्या  ‘हायकू’ या जपानी काव्यप्रकाराचा आविष्कार, ही शिरीष यांच्या  स्वतंत्र शैलीच्या  लेखनाची उदाहरणे आहेत.   

हायकूकार शिरीष पै
साहित्य क्षेत्रात आपल्या वडिलांनी उभ्या केलेल्या  प्रचंड योगदानाचे कुठलेही दडपण वा दबाव शिरीष पै यांनी स्वत:मधील लेखिकेवर घेतल्याचे दिसत नाही. अत्रे यांच्यापेक्षा अगदी वेगळ्या वाटेवरचा साहित्यप्रवास पै यांनी केला. त्यांनी कथा, कादंबरी, ललितलेखन, बालसाहित्य असे विविध लेखनप्रकार उत्तम हाताळलेच, पण जपानी संस्कृतीतला ‘हायकू’ हा अल्पाक्षरी काव्यप्रकार पै यांनीच प्रथम मराठीत रुजवला.  त्यांचे हे योगदान इतके महत्त्वाचे ठरले की, काही काळ मराठीतही ‘हायकू’ची लाट आली होती.    

आचार्य अत्रे संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान  एकदा स्थानबद्ध असताना शिरीष पै यांनी ‘नवयुग’ची सर्व जबाबदारी  अत्यंत कुशलतेने सांभाळली होती.  शिरीष पै यांच्यातील सामाजिक जाणिवांची प्रखरता त्यांच्या  पहिल्या कथालेखनातही प्रकट झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नौखाली भागात जो हिंसाचार उसळला त्यावर आधारित त्यांचे पहिले कथालेखन होते. ‘नवयुग’मध्ये शिरीषताईंनी  चित्रपट परीक्षणाचे व मुलाखतींचे कामही केले. 

शिरीष पै यांची साहित्यसंपदा   
हायकू संग्रह  :
मनांतले हायकू, हायकू, हायकूचे दिवस, नवे हायकू
काव्यसंग्रह : एकतारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र
कादंबऱ्या  : लालन, बैरागीण, हेही दिवस जातील
ललित लेखन : आजचा दिवस, आतला आवाज, अनुभवांती, प्रियजन
कथासंग्रह : चैत्रपालवी, खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार
बालसाहित्य  : आईची गाणी, बागेतल्या गमती
नाटके : हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कळी एकदा फुलली होती.
अन्य : पप्पा, वडिलांचे सेवेशी (चरित्रपर), सय, मी माझे मला.

साहित्य समृद्ध करणारी लेखिका गेली: मुख्यमंत्री   
ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांच्या निधनाने मराठी साहित्य समृद्ध करणारी लेखिका आपण गमावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आचार्य अत्रे यांच्या पत्रकारिता आणि साहित्याचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या पै यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही मोठे योगदान होते. समकालीन मराठी साहित्याला जागतिक साहित्याची ओळख व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जपानी हायकू हा काव्यप्रकार मराठीत रुजवण्याचे श्रेय त्यांना जाते. 

हरहुन्नरी साहित्यिक गमावला : तावडे  
विविध साहित्यप्रकारांत स्वतःची स्वतंत्र लेखनशैली निर्माण केलेल्या ज्येष्ठ लेखिका-कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या शिरीष पै यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाने हरहुन्नरी साहित्यिक गमावला आहे, या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. शिरीष पै यांनी कथा, कविता, ललित लेखन, बाल साहित्य, नाटक या सगळ्या साहित्य प्रकारांमध्ये स्वतःचा एक लेखक-कवी म्हणून आगळावेगळा ठसा उमटवल्याचे  तावडे म्हणाले.

अकृत्रिम जिव्हाळ्याचे स्थान हरवले
शिरीष पै यांचे निधन म्हणजे अकृत्रिम जिव्हाळ्याचे हक्काचे स्थान हरवणे आहे. साहित्याच्या  विविध प्रकारांमध्ये  त्यांनी  ज्या सहजतेने संचार केला, ती सहजता आजच्या काळात अतिशय दुर्मिळ आहे, अशा शब्दांत शिरीषताईंच्या निधनाची व्यथा मान्यवरांनी व्यक्त केली.  
  
प्रसिद्ध कवी, लेखक प्रवीण दवणे यांनी शिरीषताईंसोबतचा सुमारे ४५ वर्षांचा प्रवास उलगडला. ‘कविता दशकाची या ग्रंथाचे त्या संपादन करत असताना मी त्यांचा लेखनिक होतो. त्यानंतर माझ्या बालगीतांच्या  पहिल्या संग्रहाचे प्रकाशन शिरीषताईंनी केले होते. आई-मुलासारखं आमचं जिव्हाळ्याचं नातं होतं. आज ते हरवलं. शिरीषताई या ओशोंच्या  अनुग्रहित अनुयायी होत्या. आश्रमात त्यांचे वास्तव्यही होते. ओशो रजनीश आणि त्यांच्यात  स्नेहबंध होते. ओशोंच्या  हिंदीतील प्रवचनांचे शिरीषताईंनी मराठीत केलेले अनुवाद अतिशय तरल आणि परिणामकारक आहेत. जगणं हा उत्सव आहे, ही ओशोंची शिकवण त्या मूर्तिमंत जगल्या’, असे दवणे म्हणाले. प्रसिद्ध लेखिका आणि शिरीषताईंची मैत्रीण मोहिनी वर्दे म्हणाल्या, ‘शिरीषताई वयाच्या आणि अधिकाराच्या  दृष्टीने ज्येष्ठ, पण आमच्यात  छान मैत्री होती. कित्येक वर्षांपासूनचे येणे-जाणे होते. त्यांचा  मोठा आधार वाटत असे. अतिशय सौम्य, पारदर्शक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व  होते. त्यांच्या  लेखनात मराठी भाषेचे सोपे, सहज सौंदर्य प्रत्ययाला येते. त्यांच्यासारखं सोपं, सहज मराठी लेखन करणारं सध्या तरी कुणी दिसत नाही, असेही त्या म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...