आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेखक निघाले शालेय विद्यार्थ्यांच्या भेटीला !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - शालेय विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची वाढावी, जे शिकतो ते ज्यांनी लिहिले आहे, त्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळावी आणि त्याचे लेखन समजून घेण्यात अधिक परिपक्वता यावी, या उद्देशाने आता लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला जाणार आहेत. नातू फाउंडेशनच्या वतीने विविध शाळांमध्ये शैक्षणिक वर्षात हा उपक्रम सुरू होत आहे.

फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त दत्ता टोळ यांनी ही माहिती दिली. टीव्हीवरील विविध मालिका, काटरून्स आदी कारणांमुळे मुले वाचत नाहीत, वाचनसंस्कृती कमी होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन पाठय़पुस्तकात त्या त्या क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञांचे वेचे समाविष्ट केलेले असतात. मात्र, त्या लेखकांचा परिचय थोडक्यात दिला जातो. ज्या साहित्यकृतीतला तो अंश आहे, ती मूळ साहित्यकृती कशी आहे, लेखकाचे अन्य लेखन कोणते आहे, त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत, हे समजून घेता आले तर विद्यार्थ्यांच्या आकलनात भर पडेल. धडे, कविता, वेचे फक्त पाठय़पुस्तकात राहणार नाहीत. ते जीवनात, आचरणात उतरतील, असा विश्वास वाटल्याने हा उपक्रम सुरू केला आहे, असे टोळ म्हणाले.

या उपक्रमात पालिका शिक्षण मंडळही सहभागी होत आहे. डॉ. अनिल अवचट, निनाद बेडेकर, महावीर जोंधळे, डॉ. न. म. जोशी, दिलीप प्रभावळकर या लेखकांची विद्यार्थ्यांशी थेट भेट यातून घडणार आहे. दिवंगत साहित्यिकांचे वारस त्यांच्या लेखनाची व लेखकाची ओळख करून देतील. यात डॉ. वीणा देव (गो. नी. दांडेकर), श्रीधर माडगूळकर( ग. दि. माडगूळकर), ज्ञानदा नाईक (व्यंकटेश माडगूळकर) , डॉ. मंदा खांडगे (ग. ह. पाटील) आदींचा समावेश आहे. तसेच अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, जयंत भिडे आदी कलाकार कथा, कविता कशी आस्वादावी यावर मार्गदर्शन करतील. ज्येष्ठ साहित्यिक रा. ग. जाधव, भारत सासणे, माधुरी पुरंदरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


ओळख मूर्तींच्या साहित्याची
लेखिका सुधा मूर्ती यांच्या लेखनाच्या अभ्यासक शुभदा केसकर यांचाही सहभाग या उपक्रमात असेल. मूर्ती यांच्या विविध पुस्तकांतील उतारे, कथांचा अभ्यासक्रमांत समावेश आहे. दत्ता टोळ, प्रमुख विश्वस्त- नातू फाउंडेशन