आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेखकांनो, विरोधास सामोरे जा; निर्भिड लेखन करण्याचे शरद पवार यांचे आवाहन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत सोपानदेवनगरी (सासवड) - समांतर सेन्सॉरशिपला धाडसाने सामोरे जाण्याची तयारी लेखकांनी ठेवली पाहिजे. सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवालचाही निषेध झाला होता; परंतु काळाच्या कसोटीवर हे साहित्य टिकले. आज ते महाविद्यालयांमधून शिकवले जाते. काळ हा न्यायाधीशांच्या भूमिकेत असतो. काळाच्या कसोटीवर उतरणारे निर्भीड लेखन हवे. आपण जे लिहितो ते प्रसिद्ध झाल्यावर होणा-या विरोधाला सामोरे जाण्याची तयारी लेखकांनी ठेवली पाहिजे, असा सल्ला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी साहित्यिकांना दिला.
87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. जेमतेम 20 मिनिटांच्या भाषणात पवार यांनी मराठी साहित्यिकांकडून असलेल्या अपेक्षा आणि मराठीसमोरील आव्हानांचा ऊहापोह केला. भाषणातला बराचसा वेळ पवार यांनी संमेलन अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांचा बायोडाटा वाचून दाखवण्यात घालवला.
साहित्य संमेलन ही सामाजिक गरज असल्याचा मुद्दा पवारांनी ठासून मांडला. ते म्हणाले की, पूर्वीच्या काळी भजनाचे, कुस्तीचे, तमाशाचे फड असायचे. या फडांची जागा आता व्यासपीठांनी घेतली आहे. संमेलनाची गरज आहे का? असा सूर काही जण लावतात. माझ्या मते संमेलनांमुळे पारदर्शकता, मोकळेपणा आणि वैचारिकता मांडणीच्या वाढीला वाव मिळतो. अशा उत्सवांमुळे सामाजिक दृढता वाढीस लागत असल्यामुळे उत्सवी संमेलनाची गरज आहे.
पवारांच्या भाषणापूर्वी मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी फ. मुं. शिंदे यांच्याकडे 87 व्या संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे सोपवली. ज्यांना शब्द नाहीत त्यांचे शब्द होणे हे साहित्याचे प्रयोजन असले पाहिजे. जीवनात असंख्य प्रश्न येतात तेव्हा दुर्बळांच्या व्यथा मांडणारे लेखन केले नाही तर काळ आपल्याला क्षमा करणार नाही, असे डॉ. कोत्तापल्ले या वेळी म्हणाले. माहितीचा स्फोट होण्याच्या काळात साहित्य कोणते ज्ञान देणार आणि टेलिव्हिजनच्या जमान्यात साहित्यातून कोणती करमणूक होणार हा कळीचा मुद्दा असल्याचेही ते म्हणाले.
संमेलनाचे निमंत्रक रावसाहेब पवार यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष विजय कोलते यांनी स्वागत केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी मराठी माध्यमाच्या शाळा बंद न पडू देण्याकडे शासनाने व मराठी भाषिकांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली. खासदार सुप्रिया सुळे, आमदार विजय शिवतारे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.
पवार म्हणाले...
साहित्यिकांकडून अपेक्षा : महत्त्वाच्या प्रश्नांवर साहित्यिकांनी बोलले पाहिजे. साहित्यापुढील आव्हाने : साहित्यापुढे माहिती तंत्रज्ञानाचे आव्हान आहे; पण जे चांगले आहे ते टिकेलच. ग. दि. माडगूळकर, प्र. के. अत्रे, पु.ल. देशपांडे यांना त्यांच्या साहित्याबद्दल ठाम आत्मविश्वास होता.
ई- बुक्सचे आव्हान : सो कॉल्ड व्हर्च्युअल दुनियेत जोपर्यंत कागदाला गंध आहे, पानापानाला स्पर्श आहे. मुद्रणाच्या सौंदर्य डोळ्याला सुखावत आहे तोवर पुस्तके टिकून राहतील. साहित्य टिकून राहील.
प्रचंड गर्दी, उत्स्फूर्त प्रतिसाद
माजी संमेलनाध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी, मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ कविवर्य ना. धों. महानोर, रामदास फुटाणे यांच्यासह राज्यभरातून अनेक कवी- लेखक संमेलनास उपस्थित होते. रिपाइंचे नेते रामदास आठवले हेही ऐनवेळी संमेलनास आले. पवार यांनी त्यांचा उल्लेख ‘आमच्या क्षेत्रातले शीघ्रकवी’ असा केला. सुमारे पंधरा हजार श्रोत्यांच्या गर्दीने सभामंडप खचाखच भरून गेला होता. वक्त्यांना हशा आणि टाळ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत होता.