आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध दाम्पत्याजवळची मुलगी कोणाची, व्हाट्सअॅपवर व्हायरल होत असलेल्या मेसेजचे हे आहे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
. ही डोळस मुलगी शीतल आणि धर्मा यांचीच असून समृद्धी लोखंडे असे तिचे नाव आहे. - Divya Marathi
. ही डोळस मुलगी शीतल आणि धर्मा यांचीच असून समृद्धी लोखंडे असे तिचे नाव आहे.
पिंपरी चिंचवड- सोशल मीडियावर फिरणारा एक मेसेज सध्या एका अंध दाम्पत्याचा जीवनात धुमाकूळ घालत आहे. या दाम्पत्याचे जगणेच या मेसेजमुळे मुश्किल झाले आहे. धर्मा लोखंडे आणि शीतल लोखंडे या अंध दाम्पत्याची अडीच ते तीन वर्षांची डोळस आणि दिसायला गोंडस अशी मुलगी आहे. या मुलीच्या रंग-रुपावरुनच शीतल आणि धर्मा यांना लोकांच्या खोचक सवालांचा सामना करावा लागत आहे. ही डोळस मुलगी शीतल आणि धर्मा यांचीच असून समृद्धी लोखंडे असे तिचे नाव आहे.

कोणता मेसेज होत आहे व्हायरल
- 'समृद्धी ही लहान मुलगी पिंपरी मधील अजमेरा वसाहत येथे दिसली आहे. मात्र ज्या दाम्पत्याकडे ही मुलगी आहे, ते म्हणतात की, मुलगी आमची आहे. पण ही गोष्ट पटण्यासारखी नाही. हा फोटो इतर ग्रुप मध्ये पाठवा, काय माहित कोणाची चिमुरडी असेल पुन्हा त्यांना भेटेल.'
- असा मेसेज सध्या व्‍हाट्सअॅपवर फिरत आहे. वाऱ्याच्या वेगाने पिंपरी चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्राभर हा मेसेज व्‍हायरल झाला आहे. त्यामुळे या अंध दांपत्याला नागरिकांकडून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला आहे त्यांच्या नजरेसे हे दाम्पत्य पडल्यानंतर त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु होते. आपल्याच पोटच्या मुलीच्या खरेपणाची परक्यांना ओळख करुन देण्याचा नाहक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. 

अशी आहे सत्‍य स्थिती
शीतल पंडित यांचे मूळ गाव हे मराठवाड्यातील बीडमध्ये आहे. त्या 5-6 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड मध्ये आल्या. अंध आणि अनाथ असल्याने निगडीतील अंध-अपंग विकास असोसिएशन या संस्थेत त्यांना आश्रय मिळाला. येथेच त्यांचा विवाह पिंपरी चिंचवड मधील धर्मा लोखंडे यांच्याशी झाला. संस्थेनेच 6 मे 2013 रोजी त्यांचे लग्न लावून दिले. धर्मा लोखंडे बी.ए. पास आहे. मात्र सध्या ते बेरोजगारीशी दोन हाथ करत आहेत. 9 जून 2014 रोजी या दाम्पत्याला कन्यारत्न झाले. अंध दाम्पत्याच्या पोटी देखणी आणि डोळस मुलगी जन्माला आली. ही सत्य परिस्थिती असताना देखील या अंध दामपत्याला सर्वच नागरिकांना ओरडून सांगावे लागत आहे की, समृद्धी ही त्यांची मुलगी आहे. कारण केवळ अंध असल्याने आणि अंगावर मळकट-कळकट कपडे परिधान केल्याने त्यांच्यावर मुलगी पळवल्याचा संशय घेतला जात आहे.
 
यापूर्वीही घडला होता असा प्रसंग
विशेष म्हणजे सात ते आठ महिन्यांपूर्वी अशाच एका प्रकरणाला या अंध दाम्पत्याला पुण्यातील गरवारे महाविद्यालय परिसरात सामोरे जावे लागले होते. त्यांना तेथील नागरिकांनी त्यांची मुलगी नसल्याच्या संशयावरून त्रास दिला होता. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी अंध शीतल आणि धर्मा यांना ताब्यात देखील घेतले होते. मात्र समृद्धी ही त्यांचीच मुलगी असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. अशी माहिती अंध अपंग विकास असोसिएशन या संस्थेचे अध्यक्ष दिनकर गायकवाड यांनी दिली.
 
त्‍या खोडसाळ व्‍यक्‍तीचा शोध घ्‍या
सोशल मीडियाचा जबाबदाराने वापर करा, असे प्रबोधन प्रशासनाकडून वारंवार करण्‍यात येत असूनही कुठल्याही प्रकारची खात्री न करता असे मेसेज फॉरर्वड केले जातात. त्याची खबरदारी घेतली पाहिजे. त्‍यामुळे संबंधित व्यक्तीला त्रास होणार नाही, याची काळजी आलेला प्रत्येक मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांनी घेतली पाहिजे.  या अंध दाम्पत्यासंबंधी खोडसाळपणा करणारा व्यक्ती कोण आहे. याचा तपास पोलिसांनी लावला पाहिजे. अशी मागणी अंध अपंग विकास असोसिएशन मार्फत करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...