Home »Maharashtra »Pune» Yashomudra Font For Marathi

मराठीसाठी सी-डॅकचा ‘यशोमुद्रा’ फाँट

प्रतिनिधी | Mar 12, 2013, 03:59 AM IST

  • मराठीसाठी सी-डॅकचा ‘यशोमुद्रा’ फाँट

पुणे - सी-डॅकने मराठी भाषेसाठी ‘यशोमुद्रा’ हा फाँट विकसित केला असून राज्य सरकारच्या सर्व वेबसाइट्स, प्रकाशने आणि ई-गव्हर्नन्स सेवांसाठी हाच फाँट वापरण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारने सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अँडव्हान्सड् कॉम्युटिंगला (सी-डॅक) प्रमाण मराठी फाँट विकसित करण्यास सांगितले होते. राज्य सरकारच्या सर्व विभागांमध्ये एकजीनसीपणा आणण्यासाठी सी-डॅकने ‘यशोमुद्रा’ नावाचा फाँट विकसित केला आहे. येत्या 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी हा फाँट जारी करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने नागरिकांसाठी सर्व सूचना आणि सेवांची माहिती मराठीतूनच देण्याचा निर्णय 2009 मध्ये घेतला. तेव्हापासून सी-डॅकच्या जीआयएसटी विभागाचे तज्ज्ञ फाँट विकसित करण्याच्या प्रकल्पावर काम करत होते. सध्या अनेक मराठी फाँट उपलब्ध आहेत. मात्र, त्यात कुठेही एकजीनसीपणा नाही. त्यामुळे सर्व सरकारी ऑनलाइन आणि ऑफलाइन कामकाजासाठी एकच मराठी फाँट असावा, अशी सरकारची कल्पना होती. त्यामुळेच हा प्रमाणबद्ध फाँट विकसित करण्यात आल्याचे सी-डॅकच्या जीआयएसटी गटाचे प्रमुख महेश कुलकर्णी यांनी सांगितले. मराठी आणि हिंदीमध्ये देवनागरी लिपी वेगवेगळ्या पद्धतीने लिहिण्यात येत असल्यामुळे या फाँटमुळे काही अक्षरे गायब होण्याचा धोका कमी होणार आहे.

हा फाँट ओपन सोर्स अँप्लिकेशन असल्यामुळे कोणालाही संगणक, आयपॅड्स, टॅबलेट्स आणि मोबाइल फोनवर मोफत डाऊनलोड करता येतो. या फाँटला बोल्ड आणि इटॅलिकसारख्या स्टाइलही आहेत. हाच फाँट वापरावा, अशी कोणावरही सक्ती नाही. मात्र, मराठी फाँटमध्ये राज्यभर एकजीनसीपणा आणणे हा फाँटचा मुख्य उद्देश असल्याचे कुलकर्णी म्हणाले.

जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव या फाँटला देण्यात आले आहे. यशवंतरावांची 100 वी जयंती साजरी करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर यशोमुद्रा जारी केला जात आहे. 27 फेब्रुवारी रोजी मराठी दिनाच्या दिवशीच हा फाँट जारी करण्यात येणार होता. त्याच्या काही चाचण्या बाकी राहिल्याने आता 1 मेचा मुहूर्त काढण्यात आला आहे.

Next Article

Recommended