बारामती- गळ्यात फास अडकवलेली सेल्फी प्रियकराला पाठवून तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बारामती येथे शुक्रवारी उघडकीस आली. कीर्ती जगन्नाथ शेरे (२५) असे तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी ‘सीअारपीएफ’ जवान गणेश राऊत याच्यासह गोरख राऊत, महादेव निगडे, किरण निगडे, शीतल निगडे, सुप्रिया, संजय निगडे आणि सचिन काटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अाराेपी गणेश हा फरार झाला आहे.
दीड वर्षापूर्वी गणेश याने कीर्तीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिच्याशी अनेकदा शरीरसंबंध ठेवले. काही दिवसांपासून कीर्ती त्याच्याकडे लग्नाची मागणी करत होती. मात्र, गणेश तिला टाळत होता. यामुळे तिला नैराश्य आले होते. यातूनच कीर्तीने गुरुवारी रात्री नातेवाईक आणि पोलिसांच्या नावे चिठ्ठ्या लिहिल्या. त्यानंतर गळ्यात फास अडकवलेली सेल्फी गणेश याला व्हॉट्सअॅपवरून पाठवत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी बराच वेळ झाला तरी कीर्तीने दरवाजा उघडला नाही म्हणून आजी तिला उठवण्यास गेली. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आजीने घरातील इतर सदस्यांना माहिती दिली. कुटुंबीयांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता तिचा पंख्याला लटकलेला मृतदेह आढळून आला.
पाेलिस अधिकारी व्हायचे स्वप्न भंगले
कीर्ती ही हुशार तरुणी हाेती. ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत हाेती. भविष्यात पाेलिस अधिकारी व्हायचे तिचे स्वप्न हाेते. मात्र एका सीअारपीएफ जवानाकडून फसवणूक झाल्यामुळे ती वैफल्यग्रस्त झाली हाेती. यातूनच तिने अात्महत्येचा निर्णय घेतला व तिचे अधिकारी हाेण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले.
‘दाेषींना जन्मठेप द्यावी’
सीअारपीएफ जवान असलेल्या गणेश याचे कीर्तीसोबतच इतर दोन विवाहित महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, कीर्तीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून आपण जीवनाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. तसेच चिठ्ठीत नमूद करण्यात आलेल्यांना जन्मठेप देऊन आपल्याला न्याय द्यावा, असे म्हटले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... किर्तीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेले पत्र....