आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विळखा अमली पदार्थांचा: मॅजिक मशरूम, एस्कॅटसीने तरुणाईला घातला विळखा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अमली पदार्थाचे सेवन करणारे तरुण पारंपरिक गांजा, अफू, चरस, ब्राऊन शुगर, हशीश या पदार्थांचे सेवन करताना बहुतांशी पोलिसांना आढळतात. मात्र, देशात सध्या नवीन अमली पदार्थ मॅजिक मशरुम, सर्पदंश, एलएसडी व एस्कॅटसी टॅब्लेटस यांना तरुणाई बळी पडत असल्याचे अमली पदार्थ विरोधी पथकाच्या तपासात समोर आले आहे.


पुण्यातील एका शैक्षणिक संस्थेबाहेर राकेश विजय किडो (26,रा.केरळ) याला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यावेळी त्याच्याकडे मॅजिक मशरूम हा अमली पदार्थ प्रथमच आढळून आला. त्याने हे मशरूम तामिळनाडूतील कोडाईकॅनल येथून आणल्याचे सांगितले. मॅजिक मशरुम कोकेनपेक्षा स्वस्त असून ते घेतल्याने प्रत्यक्षात नसलेला आभास व्यक्तीला निर्माण होतो.


सर्पदंश हा वैद्यकीय क्षेत्रात ब्रेस्ट कॅन्सर अथवा कॅन्सर ट्युमर झाल्यास शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत करण्यासाठी अल्प प्रमाणात वापरला जातो. मात्र, सध्या अमली पदार्थ सेवन करणारे तरुण छोटे सर्प पिल्ले काडीपेटीत बंद करून त्याच्या जवळ तोंड नेऊन सर्पदंशाचा अनुभव घेत आहेत. मात्र हा दंश मनुष्याच्या आरोग्यास घातक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.


लायसेरेजिक अ‍ॅसिड डायइथाईलमेड (एलएसडी) हा रंगहीन व चवहीन केमिकल पदार्थ आहे. ते घेतल्याने भ्रामक कल्पना उत्पन्न निर्माण होतात. मानसिक संतुलन ढासळलेल्या व्यक्तींच्या उपचारासाठी वापरले जाणारे एलएसडीचा सध्या गैरवापर वाढला आहे.


महत्त्वपूर्ण ठिकाणांवर देखरेख
किडो याने देशातील 30 शैक्षणिक संस्थाबाहेर या अमली पदार्थाची तस्करी केली आहे. या बाबींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी महत्त्वपूर्ण ठिकाणी देखरेख ठेवली असून गस्त वाढवण्यात आली आहे. अमली पदार्थांवर कायद्याने बंदी असून त्याची विक्री अथवा सेवन करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
सुनील तांबे, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा