आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Youth Give Much Respons To The Munde Vilasrao Friendship Relation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंडे - विलासरावांच्या मैत्रीच्या किश्श्यांना तरुणाईची दाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विनायक मेटे... ही राजकीय मंडळी एकामागून एक ज्येष्ठ नेते दिवंगत विलासराव देशमुख यांच्या आठवणी जागवत होती. परंतु सर्वात कडी केली ती गोपीनाथ मुंडे यांनी. अत्यंत मोकळेपणाने विलासरावांसोबतच्या मैत्रीचा पट उलगडणा-या मुंडे यांनी शेकडोंच्या संख्येने बसलेल्या समोरच्या तरुणाईला अक्षरश: जिंकून घेतले.


निमित्त होते पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (बीएमसीसी) विद्यार्थ्यांनी विलासराव देशमुख यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे... मुंडे सभागृहात आल्यापासून ते त्यांचे भाषण संपेपर्यंत तरुणाईने त्यांना दिलेल्या उत्स्फूर्त टाळ्या आणि प्रतिसाद पाहून मुख्यमंत्र्यांसह हर्षवर्धन पाटीलदेखील स्तिमित झाले. ‘विलासराव फक्त मराठवाड्याचे नव्हते तर ते संपूर्ण राज्याचे नेते होते,’ असे सांगत मुंडे यांनी सुरुवात केली. ‘आमची दोघांचीही मैत्री राजकारणात येण्यापूर्वीपासूनची असल्याने ती अखेरपर्यंत घट्ट टिकली. अनेकांनी आमच्या मैत्रीत बिब्बा घालण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही जगाची कधीच पर्वा केली नाही. काहीही झाले तरी मैत्रीला जागण्याचा दुर्मिळ गुण त्यांच्यात होता. विलासरावांमुळेच मी पहिल्यांदा राज्याचा विरोधी पक्षनेता होऊ शकलो. छगन भुजबळांनी शिवसेना फोडली तेव्हा विलासराव संसदीय कामकाज मंत्री होते. परंतु भुजबळांबरोबर शेवटी बाराच आमदार टिकल्याने विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडेच राहण्याची चिन्हे दिसू लागली. परंतु विलासरावांनी मला त्या वेळी सांगून विरोधी पक्षनेतेपद मिळवून दिले. त्यांनी भुजबळांना तेरा आमदार आणल्याशिवाय काँग्रेसमध्ये प्रवेशच दिला नाही,’ असे मुंडे म्हणाले.


विलासरावांची नाराजी
मुंडे म्हणाले, विलासराव माझ्यावर आयुष्यात एकदाच नाराज झाले. विधान परिषद निवडणुकीत त्यांचा 0.5 मतांनी पराभव झाला. त्या वेळी मी युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व हर्षवर्धन पाटील मंत्री होते. माझ्या सांगण्यावरून पाटील यांनी त्यांना मत दिले नाही, असा त्यांचा गैरसमज झाला होता. मग मी स्वत: हर्षवर्धन पाटलांना घेऊन त्यांच्याकडे गेलो व वस्तुस्थिती सांगितली. आम्ही दोघांनी कधीच कोणत्याच निवडणुकीत एकमेकांना पाडले नाही. तो आमच्यातला अलिखित करारच होता.


सदैव अग्रभागी नाव
‘काँग्रेस प्रचारकांची यादी काढताना विलासरावांचे नाव अग्रभागी असायचे. त्यांच्या सभांसाठी गाड्या पाठवाव्या लागायच्या नाहीत. गर्दी जमवण्याची चिंता नसे. राष्ट्रीय राजकारणात त्यांना मोठे भविष्य होते,’ असे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले.


दु:खं कर्मानेही मिळतात
‘एकदा ओबीसी प्रश्नावरील चर्चा सुरूअसताना विलासराव माझ्या वक्तव्याने दुखावले होते. ‘गढीवर राहणा-या देशमुखाला पायथ्याच्या गरिबाची दु:खं काय कळणार,’ असे मी ओघात बोलून गेलो. त्यावर विलासरावांनी कळवळून उत्तर दिले, ‘मी जन्मानं देशमुख असलो तरी वावरलो तुमच्यातच ना? केवळ जन्माला आल्यानेच दु:खं कळत नाहीत, मुंडेसाहेब, कर्मानेही कळतात.’ विलासरावांच्या रक्तातच लोकशाही होती. ते जन्माने देशमुख होते पण वागण्याने नाही, असे मुंडे म्हणाले.


आबांची जि.प. शाळा
आर. आर. पाटील बोलताना वारंवार गरिबी व जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्याचा दाखला देत. एकदा मी उठून म्हणालो, ‘आदरणीय आर. आर. पाटील साहेब. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, मी स्वत: एवढेच काय, तुमचे मुख्यमंत्री विलासरावही झेडपीच्याच शाळेत शिकले. मग दरवेळी तुमच्याच झेडपी शाळेचा दाखला का देता?’ तेव्हापासून आर. आर. पाटलांनी जि.प. शाळेत शिकल्याचे कौतुक बंद केले. त्या वेळी विलासरावांनी चिठ्ठी पाठवून मला धन्यवाद दिले. त्यात गमतीने म्हटले, खूप दिवसांपासूनचा हा त्रास होता. तुमच्यामुळे तो थांबला, असे त्यात लिहिल्याची आठवणही मुंडेंनी सांगितली.