आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींना बूट मारणारा तरूण वंजारी समाजाचा; घटनेमागे मुंडेंच्या अपघाती मृत्यूचे कारण?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- केंद्रीय वाहतूक मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना सोमवारी रात्री पुण्यातील कोथरूड भागात जो बूट मारण्याचा प्रयत्न झाला त्यामागे गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूचे कारण असल्याची चर्चा आता पुण्यात दबक्या आवाजात सुरु झाली आहे. तशा आशयाचे मजकूर आज सकाळपासून सोशल मिडियात फिरत आहेत. ज्या माथेफिरू तरूणाने गडकरींवर बूट उगारला त्याचे नाव भारत कराड (वय- 37, रा. सध्या सुतारदरा, मूळ मराठवाडा) तो वंजारी समाजाचा असून भाजपचाच कार्यकर्ता असल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी मात्र या माथेफिरूने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे सांगत याप्रकरणाला वेगळे वळण मिळू नये व या घटनेबाबत जास्त जाहीर वाच्यता न होऊ देता पडदा कसा पडेल यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. संबंधित माथेफिरू अद्याप पोलिसांच्या ताब्यात त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात येत आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मेधा कुलकर्णी यांच्या प्रचारासाठी शिक्षकनगरच्या मैदानावर गडकरी यांची सोमवारी रात्री नऊ वाजता सभा आयोजित केली होती. या सभेसाठी गडकरी सव्वानऊच्या सुमारास दाखल होताच गडकरींचे जोरदार स्वागत केले. त्यावेळी गडकरींवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती तर काही तरूण गडकरींचे फोटो काढून घेण्यासाठी व हस्तांदोलन करण्यासाठी पुढे येत होते. त्याचवेळी गर्दीतून एक तरूण पायातील बूट काढून अचानक पुढे आला व त्याने गडकरींच्या दिशेने उगारला. त्यावेळी गडकरींच्या बाजूला स्थानिक भाजप नेते होते. त्यामुळे गडकरींना तो बूट लागला नाही. मात्र भाजप नेते संदीप खर्डेकर यांना तो लागला. अचानक झालेली ही घटना पटकन लक्षात आली नाही. मात्र गडकरींच्या सुरक्षारक्षकांनी व कार्यकर्त्यांनी त्यास बाजूस घेत त्याला बेदम चोप दिला. भाजपच्या पदाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळेनंतर पोलिसांनी संबंधित तरूणाला ताब्यात घेतले. त्यानंतर गडकरींनी सभा घेतली व कडक बंदोबस्तात पुढील स्थळी रवाना झाले.
दरम्यान, आता या घटनेला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे. संबंधित माथेफिरू तरूण हा वंजारी समाजाचा असून, त्याने द्वेषातून गडकरींवर बूट उगरल्याचा प्रयत्न केल्याचे पुढे येत आहे. गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत चार महिन्यापूर्वी अपघाती निधन झाल्यानंतर तो अपघात नसून घातपात असल्याची चर्चा होती. विरोधकांसह भाजपमधील अनेक नेत्यांनी मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर या चर्चेला आणखीच तोंड फुटले. गडकरी-मुंडे यांच्यातील राजकीय वितृष्ट असल्याने मुंडे समर्थकांत गडकरींबाबत रोष आहे. त्यामुळेच मुंडेंच्या अंत्यविधीला गडकरींनी जाऊ शकले नव्हते. एवढेच नव्हे तर गडकरींना बीडमध्ये प्रचारालासुद्धा येऊ दिले नाही. मुंडेंचा अपघाती मृत्यू हा वंजारी समाजासाठी मोठा धक्का होता. तो धक्का सहन होत नसल्याने कालच्या तरूणाने गडकरींवर बूट उगारून निषेध व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, सध्या विधानसभेची निवडणूक ऐन 8-10 दिवसावर येऊन ठेपली आहे. अशा स्थितीत राज्यातील सामाजिक वातावरण योग्य राहावे असे सर्वच राजकीय पक्षांना वाटत आहे. पोलिसांवरही नेत्यांच्या सभाचा व एकूनच यंत्रणेवर प्रचंड तणाव आहे. त्यामुळे अशा घटनेबाबत कोणतेही जाहीर वाच्यता करण्यास ना पोलिस तयार आहेत ना पक्षाचे कार्यकर्ते. मात्र, सोशल मिडियावरही आज सकाळपासून याबाबत मजकूर पसरविला जात आहे. यामागे राजकारण असून, आपली पोळी भाजण्याचा यातून प्रयत्न केला जाऊ शकतो.