आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाईला ‘ड्रग्ज’चा विळखा,शेजारी राज्यांसह, पाकिस्तानातूनही पदार्थांची तस्करी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आयुष्यातील ताणतणाव, ग्लॅमर, अज्ञान, चुकीचे अनुकरण, वाईट संगत, अल्पावधीत भरपूर पैसा कमावण्याच्या आमिषाने आज मोठ्या प्रमाणावर युवावर्ग अमली पदार्थांकडे आकर्षित होत आहे. अफू, गांजा या जुन्या पदार्थांबरोबरच आता युरोपातून येणा- या काही नव्या अमली पदार्थांनीही युवावर्गाला चक्रव्यूहात ओढले आहे. यातूनच शारीरिक व्याधींबरोबरच गुन्हेगारीच्या मार्गाचाही अवलंब होत आहे. व्यसनांच्या आहारी गेल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले, तर काहींना कालांतराने पश्चात्ताप होतो, मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.


राज्यात गांजा, कोकेन, ब्राऊन शुगर, अफू, चरस, हाशीम, हेरॉइन या जुन्या अमली पदार्थांची तस्करी होतेच; परंतु अलीकडच्या काळात एन एन डायएथीलीसर्गामाइड (एलएसडी), मेथाक्विलीन, मेथाअ‍ॅडन, अ‍ॅम्पीइटामिन, स्युडोफेडरिन, केटामिन, मोर्फिन, झोलपिडियम, इफेडरिन पावडर व टॅब्लेट्स आदी नव्या अमली पदार्थांची नशा तरुणाईला आकर्षित करत आहे. राज्यात मुख्यत्वे कर्नाटक, आंध्र प्रदेश या शेजारी राज्यांतून गांजा, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश येथून ब्राऊन शुगर, नेपाळ व अफगाणिस्तानातून अफू, चरस, एलएसडी, तर युरोपातून कोकेनची तस्करी होते. बेरोजगार तरुणांना या व्यवसायाच्या चक्रव्यूहात अडकवत जात असल्याचेही समोर आले आहे.


कडक कारवाईची गरज : डॉ. गंगावाल
अमली पदार्थांच्या व्यसनांपासून तरुणाईला परावृत्त करण्यासाठी काम करणारे डॉ. कल्याण गंगावाल म्हणाले, राज्यात अफू व गांजाची शेती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या घातक व्यसनांना तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर बळी पडत असून त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहेत. शासनाने अफू, गांजा व तंबाखूची पिके राज्यातून हद्दपार करून दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे,असे मत डॉ. गंगवाल यांनी व्यक्त केले.


‘ड्रग्ज’चे परिणाम किती भयंकर?
अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या मेंदू तसेच मूत्रपिंडांवर परिणाम होतो. आतडी सडतात, नपुंसकत्व येते, भूक मरते, मानसिक संतुलन बिघडते, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते. देशात सुमारे 30 कोटी लोक व्यसनाधीन असून यात तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण अधिक आहे. राज्यात सुमारे 20 ते 22 टक्के शाळकरी मुले व्यसनांच्या आहारी गेली आहेत. व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी सर्वांनी काम करण्याची गरज डॉ. गंगावाल यांनी व्यक्त केली.


महाराष्‍ट्र, गोवा विभागातील कारवाई
सन आरोपी हेरॉइन हशीश
देशी विदेशी
2010 37 28 700 ग्रॅम 177 किलो
2011 18 09 3.370 किलो 207 किलो
2012 17 05 3.385 किलो 11 किलो
2013 05 01 6.182 किलो (अद्याप नाही)


नवीन ड्रग्जचे आव्हान
गृह मंत्रालयाअंतर्गत कार्यरत अमली पदार्थविरोधी विभागाचे महाराष्‍ट्र व गोवा कार्यालयाचे विभागीय संचालक रोहित कटियार यांनी सांगितले की, नवीन अमली पदार्थांचा समावेश जुन्या कायद्यात नसल्याने त्यांना ‘एनडीपीसी’ अ‍ॅक्टखाली आणण्याचे प्रयत्न संसदेमार्फत होत आहे. अमली पदार्थविरोधी पथकातील कर्मचा- यांना अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जात असून त्याचा तस्करी रोखण्यात फायदा होत आहे.


रोहित कटियार
अमली पदार्थांचे दर (प्रतिकिलो)
गांजा- 8 हजार, चरस- 1 लाख
अफू- 2.5 लाख
ब्राऊन शुगर- 15 लाख
कोकेन- 1 कोटी
मेथाडॉन - 5.5 कोटी
मेथाक्विलीन - 5.5 कोटी