आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘झेड प्लस’ राहुल गांधींचा थेट राजभवनात मुक्काम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्यातील राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या ‘राजभवन’ येथे मुक्काम करण्याची विशेष परवानगी भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आली आहे. फक्त राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या निवासासाठी राखीव असलेल्या वास्तूत फक्त ‘खासदार’ असलेल्या गांधींना राहण्याची परवानगी कशी मिळाली, या मुद्द्यावरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात असतानाच राज्यपालांच्या कार्यालयातून ही परवानगी देण्यात आली.
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी राहुल गांधी बुधवारी पुण्यात आहेत. यासाठी त्यांना अतिविशिष्ट व्यक्तींसाठी दिली जाणारी ‘झेड प्लस’ सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने 36 नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी)ची तुकडी त्यांच्या संरक्षणासाठी तैनात आहे. ‘खासगी जागी किंवा हॉटेलऐवजी राजभवनात उतरवल्यास संरक्षणात अडचण येणार नाही, म्हणून परवानगी देण्यात यावी,’ अशी विनंती नॅशनल सिक्युरिटी गाडर्सकडून राज्यपालांना करण्यात आली होती.


‘‘राजभवनातील निवासाची परवानगी कोणाला द्यायची हा पूर्णत: राज्यपालांचा अधिकार असतो. ‘एनएसजी’कडून विनंती आल्यानंतर राहुल गांधी यांना राज्यपालांचे ‘विशेष पाहुणे’ असा दर्जा देण्यात आला. त्यानंतर राज्यपालांकडून त्यांना राजभवनात राहण्याची खास परवानगी देण्यात आली’ अशी माहिती राजभवनातील सूत्रांनी दिली. काँग्रेसचा मेळावा बालेवाडी येथे होत असून या ठिकाणी जाण्यासाठी राजभवन सोईचे ठिकाण आहे.


पुण्यातले ‘राजभवन’ : मुंबईतील गव्हर्नरांना पावसाळ्यात राहण्यासाठी ब्रिटिशांनी पुण्यात राजभवन बांधले. पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरच्या गणेशखिंडीतील राजभवनाची वास्तू 180 वर्षांहून जुनी आहे. 22 जून 1897 च्या रात्री याच राजभवनाकडे परतत असलेल्या जुलमी ब्रिटिश अधिकारी वॉल्टर रँड याला चाफेकर बंधूंनी गणेशखिंडीत गोळ्या झाडून ठार केले होते. या घटनेमुळे ‘राजभवन’चे नाव लंडनपर्यंत पोहोचले होते. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल, राष्ट्रपती या दोघांचे पुण्यातील निवासस्थान म्हणून ‘राजभवन’ राखीव झाले.


‘युवराजा’च्या दरबारात नेत्यांची हजेरी
पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौ-यावर येत असून जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, ‘युवराज’ गांधी यांच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी राज्यातील अनेक काँग्रेस मंत्र्यांनी पुण्याकडे धाव घेतली आहे. नारायण राणे, बाळासाहेब थोरात, शिवाजीराव मोघे, मधुकरराव चव्हाण आदी मंत्री पुण्यात दाखल झाले आहेत.