आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

11 जीवांसाठी देवदूत ठरली ट्रेन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - तब्बल 22 तासांपासून पुराच्या वेढय़ात अडकलेल्या टाटा स्कॉर्पिओतील 11 जणांची अखेर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता रेल्वेच्या मदतीमुळे सुखरूप सुटका करण्यात जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक व अजिंक्य साहसी संघास यश आले. थांबा नसतांनाही रेल्वेगाडी किनखेड पूर्णा स्थानकावर थांबविण्यात आली आणि बचावपथक अडकलेल्यांपर्यत पोहोचू शकले.

चोहोट्टा बाजार व केळीवेळीला नातेवाइकांकडे स्कॉर्पिओ गाडीने कामानिमित्त गेलेले मेहेत्रे व अंबळकार कुटुंब गुरुवारी रात्री परतीच्या प्रवासात रात्री साडेअकरादरम्यान दहीहांडा फाट्याजवळ नाल्याला पूर आल्याने अडकले. शुक्रवारी रात्री महसूल प्रशासन व अजिंक्य साहसी संघाच्या सदस्यांना त्यांना वाचवण्यात यश आले. मिशन फत्ते झाल्यानंतर बचाव पथकातील सदस्य तसेच दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

संततधार पावसामुळे जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदीला पूर आला आहे. गांधीग्राम ते अकोट मार्गावरील तिन्ही नाल्यांना पुराने वेढले आहे. अकोल्याकडे परतीच्या प्रवासादरम्यान, गांधीग्रामच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दहीहांडा फाट्यामार्गे मेहेत्रे व अंबळकार कुटुंबीयांनी अकोल्यात येण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, एका छोट्या पुलावरून एक फूट पाणी वाहत असताना चालकाने गाडी काढली; मात्र पुढे गेल्यानंतर समोरील पुलावर जादा पाणी असल्याने त्याला परतावे लागले. परिणामी, गुरुवारी रात्री 11.30 पासून दहीहांडा फाट्याजवळील नाल्यांदरम्यान 11 जण अडकले. नाल्यांतील पाणीपातळी वाढत गेल्याने मेहेत्रे व अंबळकार कुटुंबीय जीव मुठीत घेऊन बसले होते. नैसर्गिक आपत्ती पथकाने आणि अजिंक्य साहसी संघातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अकोटचे उपविभागीय अधिकारी टापरे, तहसीलदार संतोष येवलीकर, दहीहांडाचे पोलिस निरीक्षक राहुल आठवले घटनास्थळी उपस्थित होते.

यांनी दाखवले साहस
जिल्हा प्रशासनाचे नैसर्गिक आपत्ती पथक, अजिंक्य साहसी संघ, संत गाडगेबाबा आपत्ती निवारण पथकातील नरेंद्र बडेरे, सुनील कलके, हरिहर नीमंकडे, मधू कसबे, मारोती सपकाळ, महादेव धारपवार, रामदास सौंदळे, अमोल इंगळे, राहुल जवके दीपक सदाफळे, महेश लकडे, राहुल साटोटे, स्वप्निल अग्रवाल, अजिंक्य साहसी संघाचे सुनील कले, धनंजय भगत, नीलेश डेहनकर, देवेंद्र तेलकर, प्रशांत बुले, प्रशांत सायरे यांनी 11 जीवांना वाचवण्यासाठी साहस दाखवले.