आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ मनपा कंत्राटदारांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - हातपंपतसेच सबमर्सिबल पंप दुरुस्तीचे काम करणाऱ्या परंतु, देयके रखडलेल्या १५ कंत्राटदारांनी १४ नोव्हेंबरला महापालिका कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्वरित या कंत्राटदारांना पकडल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी या सर्व कंत्राटदारांना अटक केली. परंतु, या आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे नऊ तास पोलिस यंत्रणा घुटमळत राहिली तर चार तास महापालिकेचे कामकाजही प्रभावित झाले होते.

महापालिका क्षेत्रातील विविध प्रभागातील सार्वजनिक हातपंप तसेच सबमर्सिबल पंप दुरुस्तीचे काम कंत्राटदारांमार्फत केले जाते. एकूण ७३ कंत्राटदार हे काम करतात. परंतु, हातपंप दुरुस्ती केल्यानंतर दोन वर्षे उलटूनही कंत्राटदारांना त्यांची देयके मिळाली नाहीत. एकीकडे देयके रखडली असताना दुसरीकडे हातपंप दुरुस्तीसाठी रोखीने हातपंपांचे साहित्य खरेदी करणे अवघड जात असल्याचे पाहून कंत्राटदारांनी थकित देयके मिळण्यासाठी वारंवार निवेदने दिली. परंतु, प्रशासनाने देयके देण्याकडे दुर्लक्ष केले. अखेर २६ दिवसांपूर्वी जलप्रदाय विभागातील कंत्राटदारांनी महापालिका कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले. परंतु, साखळी उपोषणाला २० दिवस लोटल्यावरही प्रशासन अथवा पदाधिकारी यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही, ही बाब लक्षात घेऊन १३ कंत्राटदारांनी थकित देयक मिळाल्यास १४ नोव्हेंबरला आत्मदहन करण्याचा इशारा महापालिकेला दिला होता. एकाच वेळी १३ कंत्राटदारांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे आज, सकाळी सहा वाजल्यापासून महापालिका कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

पोलिस यंत्रणा आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या कंत्राटदारांचा शोधही घेत होते. अखेर अडीच वाजण्याच्या सुमारास महापालिका कार्यालयासमोरील व्यापारी संकुलातून कंत्राटदार बाहेर आले. प्रत्यक्षात १३ कंत्राटदारांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता, मात्र प्रत्यक्षात १५ कंत्राटदार या आंदोलनात सहभागी झाले. रॉकेल अंगावर ओतून घेताना त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी तत्काळ शेषराव मोरे, सुशील तिवारी, किशोर कराळे, प्रशांत गजभिये, अब्दुल रज्जाक, शेख रऊफ शेख रसुल, गजानन सोनटक्के, पुरुषोत्तम गुंडवाले, विवेक वाहुरवाघ, विराज निचळ, अनिल देशमुख, अनिल उपासे, मुरलीधर सटाले, संतोष ढगे, शेख फिरोज या १५ कंत्राटदारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.

विजय अग्रवालांनी केला तोडग्याचा प्रयत्न
कंत्राटदारांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर महापौर, उपमहापौरांनी यावर तोडगा काढणे गरजेचे होते. परंतु, विजय अग्रवाल यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून कंत्राटदारांना किमान ३० लाख रुपये देण्याची विनंती केली. तसेच कंत्राटदार संघटनेच्या नेत्यांशीही चर्चा करून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रशासनाने साथ दिल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

सामान्य नागरिकही त्रस्त
महापालिकेत जन्म-मृत्यू दाखल्यासह विविध समस्या घेऊन आलेल्या अनेक नागरिकांना महापालिका कार्यालय परिसरात तसेच मुख्य प्रवेशद्वारासमोर ताटकळत उभे राहावे लागले. यात काही ज्येष्ठ महिलांचाही समावेश होता. त्यामुळे कंत्राटदारांनी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले असले तरी या आंदोलनामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकही वेठीस धरल्या गेले.