आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकाच्या नोकरीसाठी तब्बल16 लाख रूपयांची होतेय मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राज्य शासनाच्या अपंग शिक्षण समावेशित अंतर्गत पदभरतीची बतावणी करून शेकडो युवकांच्या फसवणुकीचा डाव रचणार्‍या टोळीचा अमरावतीत पर्दाफाश झाला. शिक्षकाच्या नोकरीसाठी तब्बल 16 लाख रुपयांची मागणी करणार्‍यांनी वेळेवर पळ काढल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी उजेडात आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

जिल्हा परिषद व नगरपरिषदेशी संलग्न बुलडाणा जिल्ह्याकरिता 18 आणि वाशीम जिल्ह्याकरिता 16 शिक्षकांच्या पदासाठी उमेदवारांच्या मुलाखती 13 ऑगस्टला रुक्मिणीनगरातील शीतल प्लाझा कॉम्पलेक्समधील लाभार्थी महिला विकास मंडळाच्या कार्यालयात सुरू होत्या. या मुलाखतीसंदर्भात 10 ऑगस्टला ‘ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, आशियाड कॉलनी, अमरावती’ अशा मथळ्याखाली एका वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित झाली होती. त्यामुळेच अमरावती शहरासह अकोला, बाळापूर, बुलडाणा, चिखली, मेहकर, कारंजा लाड, मंगरुळपीर, नांदेड या ठिकाणांहून शेकडो बी.एड. पदवीधरयुवकांनी बुधवारी सकाळी 11 वाजता कार्यालय गाठले. त्यावेळी कार्यालय बंद होते. उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क केला असता, मुलाखत घेणार्‍या चमूमधील एका मोठय़ा अधिकार्‍याचा अपघात झाल्याने मुलाखती आज होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यातच मंगळवारी मुलाखत झालेले काही उमेदवार आज पुन्हा कार्यालयात आले होते. आमची मुलाखत झाल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडताच दोन व्यक्ती आम्हाला भेटल्या. त्यांनी नोकरीसाठी पहिल्यांदा 11 लाख आणि नंतर पाच लाख मागितले, असे त्यांनी मुलाखतीसाठी आलेल्या युवकांना सांगितले.

दरम्यान, काही उमेदवारांनी शिक्षण उपसंचालकांना या प्रकाराची माहिती दिली. या प्रकारामुळे आज खोटे बोलून मुलाखत प्रक्रिया बंद ठेवली. म्हणून उमेदवारांनी वासुदेव अलमारे नामक व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केले. हा घटनाक्रम सुरूच असताना एक महिला त्या ठिकाणी आली आणि तांत्रिक अडचण असल्याचे सांगत उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ही महिला शिवसेनेची पदाधिकारी असल्याचे सांगत होती. पोलिसांनी तिलाही चौकशीसाठी सोबत नेले. या प्रकरणी नांदेड येथील केशव जाधवने राजापेठ पोलिसांत तक्रार दिली.