आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

17 अतिरिक्त शिक्षकांचे भवितव्य अजूनही ‘अधांतरी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोताळा - सन 2012 मध्ये झालेल्या पटपडताळणीनुसार आणि आरटीई कायद्यानुसार मोताळा तालुक्यात 17 प्रायमरी शिक्षक अतिरिक्त ठरले असून, मागील दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेने त्यांची वेतन देयके स्वीकारली नसल्याची माहिती समोर आली आहे.

मोताळा तालुक्यातील शाळांमध्ये एकूण 17 प्राथमिक शिक्षक हे अतिरिक्त ठरले आहेत. त्यांना दोन महिन्यांपासून वेत मिळालेले नाही. दरम्यान आता उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरु झाल्याने या शिक्षकांनी आपल्या पूर्वीच्या शाळेत रुजू व्हावे की मुख्यालयी पंचायत समिती कार्यालयात हजर राहावे, याबाबत स्पष्ट सूचना न दिल्याने जिल्हा परिषदेचा विस्कळीत कारभार समोर आला आहे. अखेर हे शिक्षक 26 जून संबंधित शाळांमध्ये उपस्थित राहिल्याची माहिती आहे.

आरटीई कायद्यानुसार शासनाने विद्यार्थी संख्येनुसार मंजूर शिक्षकांची पदे निर्धारीत केली आहेत. त्यानुसार 60 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक, 61 ते 90 विद्यार्थ्यांमागे तीन शिक्षक, 91 ते 120 विद्यार्थ्यांमागे चार शिक्षक, 121 ते 150 विद्यार्थ्यांमागे पाच शिक्षक, 151 ते 200 विद्यार्थ्यांमागे सहा शिक्षक व एक मुख्याध्यापक अशा प्रकारची शिक्षक पदे मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार मोताळा तालुक्यात 17 शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. एप्रिल महिन्यापासून वेतन देयकांची प्रक्रिया आॅनलाईन झाल्यामुळे शाळेवर शिक्षकांची जेवढी पदे आहेत तेवढीच पदे मंजूर असून, तेवढेच वेतन देयके संगणकाद्वारे स्वीकारली जात आहेत. यामुळे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे वेतन त्या ठिकाणी निघाले नाही. त्यामुळे या शिक्षकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. यासंदर्भात वरिष्ठांनी निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
असा निघू शकतो तोडगा
मोताळा तालुक्यात 17 शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, तर 11 शिक्षक मे महिन्यात सेवानिवृत्त झाले आहेत. 30 जूनपर्यंत आणखी चार शिक्षक व जुलै ते सप्टेंबरदरम्यान दोन शिक्षक असे एकूण 17 शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांमध्ये काही पदवीधर असून, पदोन्नतीद्वारे त्यांची मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखपदी नियुक्ती करता येऊ शकते. त्याचप्रमाणे मोताळा तालुक्यात या वर्षी 44 ठिकाणी इयत्ता पाचवी व 22 ठिकाणी आठवीचे नव्याने वर्ग सुुरु होत आहेत. त्यामुळे काही शिक्षकांना पदोन्नती देऊन त्यांचे समायोजन करणे शक्य आहे, अशा उपाययोजना अभ्यासकांनी सुचवल्या आहेत.
वेतनाबाबत आदेश
काही कारणास्तव शिक्षक अतिरिक्त ठरत असतील तर त्यांची वेतन देयके थांबवण्यात येऊ नये, असे शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार पंचायत समितीने संबंधित शिक्षकांची वेतन देयके मॅन्युअली जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आली होती. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने एप्रिल व मे महिन्याची देयके स्वीकारली नाहीत.
शिक्षक संभ्रमावस्थेत
अतिरिक्त असलेल्या शिक्षकांची वेतन देयके न थांबवता त्यांना मुख्यालयी समकक्ष पदावर अस्थापना देण्यात यावी किंवा त्वरीत समायोजन करण्यात येऊन तालुक्यातील रिक्त पदी त्यांची पदस्थापनाकरण्यात यावी, असे अपेक्षित आहे. परंतु या बाबतीत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. 26 जूनपासून जिल्ह्यात शाळा सुरु झाल्या. आॅनलाईन प्रक्रियेमुळे या शिक्षकांची वेतन देयके त्यांच्या पूर्वीच्या शाळेवर निघणे शक्य नाही, त्यांच्या नवीन अस्थापनेबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतेही आदेश दिले नाहीत. त्यामुळे या शिक्षकांनी शाळेत रुजू व्हावे किंवा पंचायत समिती कार्यालयात रुजू व्हावे, या बाबतीत शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे. अखेर कोणतेही मार्गदर्शन न मिळाल्याने हे शिक्षक 26 जूनला शाळेत रुजू झाले.