आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेतील महत्त्वाची १८ पदे रिक्त, कामकाजावर होतोय परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेतील महत्त्वाची १८ अधिकार्‍यांची पदे रिक्त आहेत. राज्यात युतीचे शासन आल्यावर ही रिक्त पदे भरल्या जातील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली होती. परंतु, युतीचे शासन येऊन सात महिन्यांचा कालावधी होत आला आहे. परंतु, रिक्त पदांवर नियुक्ती झालीच नाही, या उलट अधिकार्‍यांच्या बदल्या मात्र झाल्या. यामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला असून, रिक्त पदे भरली केव्हा जाणार? अशी चर्चा अकोलेकरांमध्ये सुरू आहे.

२००१ ला महापालिका अस्तित्वात आली. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर आता शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. प्रारंभीच्या काही वर्षांत शहरात विकासकामेही नागरिकांना दिसली. प्रारंभी, आयुक्त, दोन उपायुक्त, सहायक आयुक्त, शहर अभियंता अशा सर्व पदांवर अधिकारी होते. त्यामुळे कामकाजही सुरळीत सुरू होते. परंतु, पुढे महापालिकेतील राजकारणाला कंटाळून अधिकारी वैतागून बदली करून गेले.

महापालिकेतील हे चित्र अद्यापही बदललेले नाही. त्यामुळे महापालिका अस्तित्वात येऊन १५ वर्षांचा कार्यकाळ झाला असला तरी अद्यापही २७ अधिकार्‍यांची पदे रिक्त आहेत. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, पर्यायाने कामकाजही ढेपाळले आहे. रिक्त पदांवर लवकरच अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांसह आमदारांनी दिले आहे. परंतु, या आश्वासनाची पूर्तता नेमकी केव्हा केली जाईल? हाच मुळात आता सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेचा विषय झाला आहे. या सर्व प्रकारामुळे नियुक्त अधिकार्‍यांकडे अनेक जबाबदार्‍या सोपवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या अधिकार्‍यांना कोणत्याही एका कामाकडे लक्ष केंद्रित करता येत नाही. या सर्व प्रकारामुळे कर भरणारा सर्वसामान्य नागरिक मात्र वेठीस धरला जात आहे.

आस्थापना खर्च महत्त्वाचे कारण : रिक्तपदे भरताना आस्थापना खर्च अधिक हे कारण पुढे केले जाते. परंतु, अधिकार्‍यांची महत्त्वाची रिक्त पदे भरल्याशिवाय महसुलात वाढ होणार नाही. महसुलात वाढ झाली की, आस्थापना खर्चही कमी होऊ शकतो. परंतु, पदाधिकारी या महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष देत नाहीत.

असा होतो परिणाम
आयुक्तांच्याहाताखाली दोन उपायुक्त उपायुक्तांच्या हाताखाली चार सहायक आयुक्त असल्यास कामाची विभागणी केली जाते. आयुक्तांना प्रत्येक कामावर लक्ष ठेवता येते. याच बरोबर नगररचना विभागातील पदे रिक्त असल्याने उपलब्ध दोन कनिष्ठ अभियंत्यांनाच मालमत्तांचे मोजमाप, नकाशा मंजूर करणे, अतिक्रमण, लेआऊट, सुरू असलेले बांधकाम पाहणे आदी जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. एकाच वेळी एक अथवा दोन अधिकारी याकडे लक्ष देऊ शकत नसल्याने यातून अवैध बांधकामे उदयाला येतात.

महापालिकेतील इतर रिक्त पदे अशी : महापालिकेतया महत्त्वाच्या पदांसोबतच इतर महत्त्वाची पदेही गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. यात पर्यावरण संवर्धन अधिकारी, महिला बाल विकास अधिकारी, समाज विकास अधिकारी, सिस्टिम मॅनेजर, वैद्यकीय अधिकारी, महिला वैद्यकीय अधिकारी, युनानी चिकित्सक, लेखाधिकारी, सांख्यिकी अधिकारी आदी पदेही रिक्त आहेत.

प्रभारच प्रभार
महापालिकेततूर्तास सर्व महत्त्वाच्या पदांवर प्रभारी अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. प्रभारी अधिकार्‍यांच्या माध्यमातून महापालिकेचे कामकाज सुरू आहे. प्रभार दिल्यानंतर संबंधित अधिकारी आपापल्यापरीने काम करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, हे काम योग्य प्रकारे होत नसल्याने कामकाजावर परिणाम होत आहे.

उपायुक्तांसह सहायक आयुक्तांची पदे रिक्त
महापालिकेत दोन उपायुक्तांची पदे रिक्त आहेत. यापूर्वी एक उपायुक्तांचे पद रिक्त होते, तर एका पदावर दयानंद चिंचोलीकर होते. उपायुक्ताचे दुसरे रिक्त पद भरता, दयानंद चिंचोलीकर यांचीच बदली झाली. त्यामुळे तूर्तास उपायुक्तांची दोन्ही पदे रिक्त आहेत, तर चार सहायक आयुक्तांपैकी दोन सहायक आयुक्त कार्यरत आहेत, तर दोन सहायक आयुक्तांची पदे रिक्त आहेत.

लवकरच नियुक्ती
महापालिकेतील महत्त्वाची रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या काही दिवसांत महापालिकेत महत्त्वाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाईल. जेणेकरून महापालिकेच्या कामकाजात सुधारणा होईल. डॉ.रणजित पाटील, पालकमंत्री.

महापालिकेतील महत्त्वाची रिक्त पदे
1 नगर सचिव
1 आरोग्य अधिकारी
1 सहा. मूल्य निर्धारण अधिकारी
3 उपअभियंता
1 मुख्य अग्निशमन अधिकारी
1 मूल्य निर्धारण अधिकारी
1 सहा. संचालक नगररचना
2 कार्यकारी अभियंता
1 उपसंचालक नगररचना
1 शहर अभियंता
बातम्या आणखी आहेत...