अकोला - महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत निसटता विजय मिळविणारे माजी महापौर मदन भरगड यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय होणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापालिका निवडणुकीत कॉग्रेसचे महानगराध्यक्ष तथा माजी महापौर यांच्या विरुद्ध भाजपचे मनोज शाहु यांनी निवडणुक लढविली होती. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत मदन भरगड यांना निसटता विजय मिळाला होता. याबाबत मनोज शाहु यांनी बोगस मृत व्यक्तींच्या नावे मतदान झाल्याची याचिका अकोला दिवाणी न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणात दाखल केलेल्या पुराव्यां संदर्भात मदन भरगड यांनी हरकत दर्शविली होती.
दिवाणी न्यायालयाने हा अर्ज खारीज केल्या नंतर मदन भरगड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याला आव्हान दिले होते. या प्रकरणात न्यायालयाने मदन भरगड यांची याचिका खारीज करुन दिवाणी न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. या प्रकरणात मनोज शाहू यांची बाजू अॅड.चंद्रकांत वानखडे यांनी मांडली. उच्च न्यायालयाने मदन भरगड यांची याचिका खारीज केल्याने आता या प्रकरणात काय होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.