आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात 565 समलैंगिक; 22 जणांना एचआयव्ही बाधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - अकोल्यात समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या येथे तब्बल 565 समलैंगिक युवक असून, त्यापैकी 22 जण एचआयव्हीबाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही समलैंगिकतेचे प्रमाण वाढत आहे.

अकोल्यासारख्या लहान शहरात समलैंगिक संबंध ठेवणार्‍यांची संख्या वाढत आहे. मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली जात असतानाही एचआयव्ही-एड्सचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ‘एमएसएम’वर तीन सामाजिक संस्था काम करतात.

समलैंगिक युवकांना शोधून त्यांना या प्रवाहातून बाहेर काढण्यासाठी मागील पाच वर्षांपासून जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध पथकासह ‘एनजीओ’ प्रयत्न करत आहेत. पण, या प्रवाहात अडकलेल्या या युवकांना बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले आहे. सर्वसाधारणपणे होस्टेल्स, शेअरिंग रूममध्ये राहणारे मित्र, वसतिगृह परिसर या ठिकाणी समलैंगिकता वाढत असल्याचे दिसते. 10 वर्षांच्या बालकांपासून ते 60 वर्षांचे वृद्ध समलैंगिक असल्याची माहिती समोर आली. माहिती आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबतच समाजातील एकांतप्रिय व्यक्ती प्रामुख्याने इकडे वळतात, असा निष्कर्ष काढण्यात आला. समाजातील समलैंगिकतेच्या गर्तेत अडकलेल्यांना त्यातून बाहेर काढण्याची गरज आरोग्य विभागातील सूत्रांनी व्यक्त केली. जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध पथकामार्फत अशा व्यक्तींना शोधून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.

धोका टाळण्यासाठी चाचणी करण्याची गरज
वय वर्ष 10 ते 60 वयोगटातील अनेकांमध्ये समलैंगिकतेची प्रवृत्ती समाजात आढळते. ही मानसिकता आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी समलैंगिक युवकांनी एचआयव्ही चाचणी करून घ्यावी. कुणी या प्रवाहात अडकल्याचे लक्षात येताच त्यांना या मानसिकतेतून बाहेर काढण्याचे प्रयत्न करावेत.’’ डॉ. प्रमोद ठाकरे, मानसोपचार तज्ज्ञ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय

सकारात्मक विचाराची गरज
जिल्ह्यात साडेपाचशेहून अधिक व्यक्ती समलैंगिक आहेत, या व्यक्तींना आरोग्य सुविधा देण्यासोबतच आमची संस्था रोजगार मिळवून देण्यासाठी कार्य करत आहे. या व्यक्तींविरुद्ध नकारात्मक दृष्टिकोन न ठेवता त्यांच्याकडे सकारात्मकतेने पाहावे.’’ अरुंधती शिरसाठ, अध्यक्ष, गुणवंत शिक्षण संस्था अकोला.

समुपदेशनाची गरज
समलैंगिकांना यातून बाहेर काढणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढेल. समलैंगिकांना समुपदेशनाची गरज असते. या संबंधातून 22 युवकांना एचआयव्हीची लागण झाली आहे.’’ दर्शन जनईकर, कार्यक्रम व्यवस्थापक, एचआयव्ही-एड्स नियंत्रण व प्रतिबंध पथक