आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला मनपात फायरमनची २३ पदे रिक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका अग्निशमन विभागातील २४ पैकी २३ फायरमनची पदे रिक्त आहेत. त्यामुळे महानगरासह जिल्ह्यात आगीपासून होणाऱ्या जीवित वित्तहानीपासून संरक्षण करण्याची जबाबदारी मानसेवी कर्मचाऱ्यांवर येऊन पडली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक महिन्यांपासून ही पदे रिक्त असताना पदाधिकारी मात्र, एकमेकांना शह-काटशह देण्यातच गुंग आहेत.
शहरासह जिल्ह्यात आगीच्या घटना घडल्यास नागरिकांच्या जीविताचे तसेच मालमत्तांचे संरक्षण करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे आहे. अग्निशमन विभाग ही जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, अग्निशमन विभागासारख्या अतिमहत्त्वाच्या विभागातील रिक्तपदांकडे प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख आहे. जिल्ह्यात सहा तालुके आहेत. यापैकी पाच ठिकाणी नगरपालिका कार्यरत आहे, तर एका ठिकाणी अद्यापही ग्रामपंचायत आहे. पाचपैकी तीन नगरपालिकांकडे अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आगीची मोठी घटना घडल्यास अकोला महापालिका अग्निशमन विभागाला अत्यंत विपरीत परिस्थितीत ही सेवा द्यावी लागते. मार्च महिन्यापासूनच आग लागण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. शहरात काही दिवसांपूर्वीच भंगार बाजाराला आग लागून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. त्यामुळे किमान उन्हाळ्याच्या प्रारंभी अग्निशमन विभाग सुसज्ज असणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सर्वात मोठी अग्निशमन यंत्रणा महापालिकेकडे असताना हा विभाग सक्षम असणे गरजेचे आहे. परंतु, अत्यंत तोकड्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत या विभागाला नागरिकांच्या जीवित वित्तहानीपासून संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. अकोला महापालिका अग्निशमन विभागात २४ फायरमनची पदे मंजूर आहेत. यापैकी २३ पदे रिक्त आहेत.

विम्याचा प्रस्ताव तयार

अग्निशमन विभागातील कायम आस्थापनेसह मानसेवी कर्मचाऱ्यांचा विमा काढण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव लवकरच प्रशासनाकडे सादर केले जाईल.'' रमेशठाकरे, मुख्य अग्निशमन अधिकारी

विमाही काढलेला नाही : तत्कालीनआयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी एक वर्षापूर्वी अग्निशमन विभागात कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचा विमा काढण्याचे आदेश दिले होते. अग्निशमन विभागासोबत इतर विभागातीलही कर्मचाऱ्यांचा विमा काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, अद्यापही विमा काढलेला नाही.
केवळ एक फायरमन : मूळनियुक्ती आरोग्य विभागात असलेला परंतु गेल्या दहा वर्षांपासून अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या एका फायरमनला महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सुरक्षा रक्षक केले आहे. हा फायरमन गणवेशात या अधिकाऱ्यासोबत फिरत असतो. एकीकडे फायरमनची पदे रिक्त असताना प्रशिक्षित फायरमनला सुरक्षा रक्षक करण्याच्या या प्रकाराकडे आयुक्त, महापौर, विरोधी पक्षनेत्यांनी दुर्लक्ष केले आहे.
तुम्ही फक्त आग विझवा : औद्योगिकवसाहतीचे स्वत:ची अग्निशमन यंत्रणा आहे. मात्र, अकोला औद्योगिक वसाहतीत केवळ आग विझवण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे अकोला औद्योगिक वसाहतीत आगीची घटना घडल्यास आग विझवण्याची जबाबदारी मनपा अग्निशमन विभागावर येते.

कुली-क्लीनर झाले फायरमन : मुख्यअग्निशमन अधिकाऱ्यासह कायम आस्थापनेवर २८ कर्मचारी कार्यरत यात कुली क्लीनरची संख्या १७ आहे. त्यामुळे २८ मानसेवींना अग्निशमन विभागात नियुक्त करण्यात आले आहे. यात वाहनचालक, सुरक्षा रक्षक, क्लीनर आदींचा समावेश आहे. यांच्या भरवशावर मुख्य अग्निशमन अधिकारी लीडर फारयमनला आग आटोक्यात आणण्याकरिता महत्त्वाची कार्य करावे लागते.