आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंदखेडराजा विकास प्राधिकरण 300 कोटींचे - हसन मुश्रीफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - शेगाव, मोझरीच्या धर्तीवर मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने पुढे पाऊल टाकले आहे. 300 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याच्या अनुषंगाने डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार दिलीप सानंदा, राहुल बोंद्रे, आमदार विजयराज शिंदे, विभागीय आयुक्त डी. आर. बन्सोड, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख उपस्थित होते.

सिंदखेडराजाचा विकास आराखडा तूर्तास 250 कोटी रुपयांचा असला, तरी तो प्राथमिक स्वरूपाचा असून, तो 300 कोटी रुपयांपर्यंतही जाऊ शकतो. त्यादृष्टीने मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीच्या पायाभूत विकासास प्राधान्य देण्यात येणार आहे. यामध्ये लखोजीराजे जाधव यांचा राजवाडा, रंगमहाल दुरुस्ती, मोती तलाव सौंदर्यीकरणासोबतच जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त येणाºया भाविकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि लखोजीराजे जाधव यांचा पुतळा बसवण्यासाठीही एक कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा या वेळी करण्यात आली.

‘दिव्य मराठी’चा पाठपुरावा : मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीच्या सर्वांगीण विकासासोबतच, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संवर्धन आणि जिजाऊ जन्मोत्सवाच्या अनुषंगाने येथे पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात यासाठी दैनिक दिव्य मराठीने सातत्याने पाठपुरावा केला आहे. सिंदखेडराजा विकास आराखड्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने 16 नोव्हेंबर 2014 ला विभागीय आयुक्तांनी केलेल्या पाहणीचे सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना आराखड्याच्या अनुषंगाने सिंदखेडराजाला जाऊन नागरिकांचे अभिप्राय नोंदवण्याबाबत दिलेल्या सूचनांचेही सविस्तर वृत्त दिले होते.
सोबतच विकास प्राधिकरण स्थापन्याबाबतच्या हालचालींना विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर 16 जूनच्या अंकात सिंदखेडराजा विकास प्राधिकरण अधांतरी, असे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सिंदखेडराजा विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती देऊन 300 कोटी रुपयांपर्यंत हा सर्वसमावेशक प्रकल्प जाण्याचे सूचित करून डीपीआर प्लॅनसाठी 50 लाख रुपयांची तरतूद केल्याचे स्पष्ट केले.

जून 2013 मध्ये तत्त्वत: मान्यता
या विकास प्राधिकरणाला 12 जून 2013 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली होती. शेगाव, मोझरीच्या धर्तीवर येथील विकास व्हावा, अशी अपेक्षा त्या वेळी व्यक्त केली होती. त्यापूर्वी 25 आॅगस्ट 2011 मध्ये सिंदखेडराजा, लोणारच्या विकासासाठी शासनाने प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय घेतला होता.

जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थनगरीत येणाºया भाविकांना पायाभूत सुविधा मिळण्याच्या दृष्टीने या आराखड्यात नियोजन करण्यात येणार आहे. सिंदखेडाराजाचे महत्त्व विचारात घेऊन ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन, शहराच्या सर्वांगीण व पायाभूत विकासास चालना देणाºया पायाभूत बाबींवर प्रकर्षाने लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

16 नोव्हेंबर 2014 रोजी विभागीय आयुक्त डी. आर. बन्सोड यांनी सिंदखेडराजा येथे प्रत्यक्ष भेट देऊन ऐतिहासिक वास्तू व शहराची दोन तास पाहणी केली होती. त्यानंतर पालिकेच्या टाउन हॉलमध्ये शहरातील नागरिकांची बैठक घेऊन त्यांचे विकास आराखड्याबाबतचे अभिप्राय जाणून घेतले होते. सोबतच सिंदखेडराजाचे ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवत विकासासाठी आवश्यक बाबींचा यात समावेश करण्याचे आश्वासन दिले होते.