आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

34 गावे पुराच्या विळख्यात; ग्रामस्थांचा जीव टांगणीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील 34 गावे पुराच्या विळख्यात सापडली असून, 22 हजार ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागलेला आहे. या ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मागील सात वर्षांपासून प्रलंबित आहे.

दरवर्षी पावसाळा आला की पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. महसूल विभागामार्फत सूत्रे हलवण्यात येतात. पुरामुळे जीव मुठीत घेऊन प्रामुख्याने अकोला, बार्शिटाकळी, तेल्हारा आणि पातूर तालुक्यातील नागरिकांना आपले बस्तान इतरत्र हलवावे लागते. हा प्रश्न दरवर्षी भेडसावणारा असतानाही नागरिक पुनर्वसनाच्या तयारीत दिसत नाहीत.

नागरिकांचीच इच्छा नसल्याने प्रशासनाकडून फारसा पाठपुरावा केला जात नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पुनर्वसन अधिकारी आर. एम. लोखंडे यांनी पुनर्वसनासाठी प्रयत्न केले होते. प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांनीही जिल्हाधिकार्‍यांच्या हाकेला साद देत ग्रामस्थांना पुनर्वसनासाठी नियोजन केले होते. प्रशासकीय मंजुरातीसाठी हे पुनर्वसन रखडले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली. जिल्ह्यातील पुनर्वसनाची फाइल मंत्रालयात धूळ खात पडली आहे.

हंगामी उपाय नको
नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणारी संकटे ही नियमितपणे येणारी असतात. प्रशासन त्यावर हंगामी उपाय करून मोकळे होते. काही संकट या उपायांनाही तिळमात्र जुमानत नाही. अशा समस्यांमध्ये पुराच्या संकटाचा समावेश होतो. पुनर्वसनामध्ये सर्वाधिक मोठा अडथळा जनतेच्या मानसिकतेचाच आहे.
नऊ गावांचे कायम पुनर्वसन
उमा बॅरेज, पूर्णा बॅरेज, काटेपूर्णा बॅरेज, घुंगशी बॅरेज अंतर्गत येणार्‍या नऊ गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन प्रस्तावित आहे. येत्या दोन वर्षामध्ये गावांचे पुनर्वसन होईल. यामध्ये लंघापूर, रोहणा, कोही, माना, सुलतानपूर, अंत्री मलकापूर, उरळ बु., उरळ खुर्द अशा नऊ गावांचा समावेश आहे.

प्रक्रिया लवकर पूर्ण होईल
जिल्ह्यातील उमा बॅरेज, पूर्णा बॅरेज, काटेपूर्णा बॅरेज, घुंगशी बॅरेज अंतर्गत येणार्‍या नऊ गावांचे पुनर्वसन कायमस्वरूपी करण्यात येणार आहे. पुढील दोन वर्षांमध्ये पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. प्रशासकीय कामकाज सुरू आहे. ’’
गजानन सुरंजे, उपजिल्हाधिकारी, अकोला.
ठराव प्रलंबित असलेली जिल्ह्यातील गावे
अकोला तालुका - हिंगणा, म्हैसपूर, लाखनवाडा, चांदूर, निंबी मालोकार, रमाबाई आंबेडकरनगर, बाखराबाद, सुकोडा, धामणा नेर

बार्शिटाकळी तालुका - दगडपारवा, खांबोरा, टाकळी छबिले, कान्हेरी सरप, तामसी, मोरगाव काकड, साहित, अशोकनगर, पारडी

अकोट तालुका - किनखेड जुने, पिलकवाडी
तेल्हारा तालुका - तळेगाव पातुर्डा, पिवंदळ, उमरी जुनी, आडसूळ, नेर
बाळापूर तालुका - अंदुरा
पातूर तालुका- पास्टुल, लावखेड, अडगाव खुर्द, बोडखा, चोंडी, कोठारी, आगीखेड
मूर्तिजापूर - दातवी पूर्णा