अकोला - बीसीए अभ्यासक्रमाची परीक्षा दिल्यानंतरही गुणपत्रिकेवर मात्र गैरहजर असल्याचे कळल्याने विद्यार्थ्यांच्या पायाखालील जमीनच सरकली आहे. चार महाविद्यालयातील 38 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
श्री संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत ‘बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन’ या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी एप्रिल 2014 मध्ये परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल जुलै महिन्यात जाहीर झाला. यामध्ये शहरातील वैदेही विष्णू सराफ बीसीए महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, खंडेलवाल महाविद्यालय व आरडीजी महाविद्यालयातील 38 विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर गैरहजर लिहून आले आहे.
विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवण्यात आल्याने सर्व विद्यार्थी नापास झाले असून, त्यांचे एक वर्ष वाया गेले आहे. बीसीएच्या भाग 1 व भाग 2 च्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, कॉम्प्युटर फंडामेंटल, न्युमेरिकल मेथॉड्स, डिजिटल टेक्निक्स, सी. प्रोग्रामिंग डिस्क्रीट मॅथेमॅटिक्स, ऑपरेटिंग सिस्टिम, अॅडव्हान्स्ड सी, डिस्क्रिट मॅथेमॅटिक्स या पेपरला गैरहजर दाखवले आहे.
परीक्षेला हजर होतो, तरी गैरहजर कसे परीक्षेला हजर असताना गैरहजर दाखवल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. त्यामुळे परिक्षा केंद्राने परीक्षेला हजर असल्याबाबत आम्हाला पुरावा दाखवा, अशी मागणी नापास विद्यार्थ्यांनी केली आहे.
प्राचार्यांना पत्र पाठवले
एल.आर.टी. वाणिज्य महाविद्यालयात परीक्षा झाल्याने विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालेल्या प्रकाराबाबत तेथील प्राचार्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. आमच्या महाविद्यालयाप्रमाणे इतरही काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत असे झाले आहे. ’’
संजय गोटफोडे, जनसंपर्क अधिकारी, वैदेही विष्णू सराफ महाविद्यालय, अकोला
परीक्षा विभागाला दिली माहिती
अशा प्रकारची चूक होणे गंभीर बाब आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे निश्चितच नुकसान झाले आहे. याबाबत परीक्षा विभागाला माहिती देण्यात येईल.’’ विलास नांदुरकर, जनसंपर्क अधिकारी, अमरावती विद्यापीठ.