आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. कोरपेंना ४८ हजारांचा दंड, उपायुक्त मडावी यांची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - रिअसेसमेंट मोहिमेत विशेष पथकाने काँग्रेस नेते डॉ. सुभाष कोरपे यांच्या निवासस्थानी अवैध नळजोडणी आढळून आल्याबद्दल १९ जून रोजी ४८ हजारांचा दंड आकारला. उपायुक्त माधुरी मडावी यांनी केलेल्या या कारवाईची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
आतापर्यंत झालेल्या या मोहिमेत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप झाला नाही.
राजकीय नेते तसेच आमदार, खासदार, आजी-माजी मंत्र्यांच्या निवासस्थानांचेही मोजमाप करण्यात आले आहे. त्यामुळेच ही मोहीम चर्चेची ठरली असून, या मोहिमेमुळे महापालिकेच्या मालमत्ता करात कोट्यवधी रुपयाने वाढ होणार आहे. या मोहिमेसोबतच अवैध नळजोडणी तपासणी मोहीमही सुरू आहे. यासाठी नियमित पथकासोबतच विशेष पथकही स्थापन करण्यात आले आहे. १९ जूनला झालेल्या मोहिमेत रामनगर भागात राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुभाष कोरपे यांच्या निवासस्थानी एक इंची अवैध नळजोडणी आढळून आली. अवैध नळजोडणीप्रकरणी डॉ. सुभाष कोरपे यांना एकूण ४८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती उपायुक्त माधुरी मडावी यांनी दिली. राजकीय नेत्याच्या निवासस्थानी अवैध नळजोडणी आढळून आल्याप्रकरणी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्यांनाही ४८ हजारांचा दंड आकारण्यात आल्याने या कारवाईची चर्चा दिवसभर सुरू होती. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे उपायुक्त माधुरी मडावी यांच्या कारवाईचे कौतुकही केले जात आहे.

दरम्यान, याच भागात बहिणाबाई निवासस्थानात होस्टेल तसेच घरगुती नळजोडणीचा व्यवसायासाठी वापर केल्याप्रकरणी ६१ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. उपायुक्त माधुरी मडावी यांनी केलेल्या या कारवाईत नंदलाल मेश्राम, महेश जुनगडे, उस्मानभाई, नीरज ठाकूर आदी सहभागी झाले.
बातम्या आणखी आहेत...