आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर-जीवरून पुन्हा वादळ; सर्वच कंपन्यांच्या केबल कामाला बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - फोर-जी केबल टाकण्याचे काम सुरू झाल्यापासून वादग्रस्त ठरले आहे. अनेक वेळा हे काम बंद करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. २२ एप्रिलला झालेल्या स्थगित महासभेत पुन्हा या विषयावर वादळी चर्चा होऊन रिलायन्ससह सर्वच कंपन्यांचे केबल टाकण्याचे काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
२० नोव्हेंबरला विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी महासभा बोलावण्यात आली होती. ११ विषयांपैकी सहा विषयांवर चर्चा झाल्यानंतर ही सभा तहकूब करण्यात आली होती. तहकूब झालेली सभा डिसेंबरला पुन्हा बोलावण्यात आली. परंतु, सभा घेताच ही सभाही तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब सभा २२ एप्रिलला बोलावण्यात आली. या सभेत रिलायन्स, वोडाफोन कंपनीकडून प्राप्त निधीचे नियोजन तसेच करारनाम्याव्यतिरिक्त केलेल्या कामाबाबत चर्चा करणे, विद्युत, साफसफाईचे नियोजन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

फोर-जी वर या सभेत सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी तोंडसुख घेतले. केबल टाकण्याच्या कामामुळे जलवाहिन्या फुटणे, रस्ते नादुरुस्त होण्याचे प्रकार सातत्याने घडताहेत, ही बाबही नगरसेवकांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. अखेर सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकल्यानंतर महापौर उज्ज्वला देशमुख यांनी या कामाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करून अहवाल प्राप्त होईपर्यंत सर्वच कंपन्यांचे काम बंद करण्याचा निर्णय मंजूर केला.

भाजपचे नगरसेवक बाळ टाले यांनी फोर-जी केबलमुळे नेमके कसे नुकसान झाले, तसेच एअरटेल कंपनीचे टेबल टाकण्याचे कामही परवानगी घेताच सुरू असल्याची माहिती प्रशासनाला दिली, तर ज्येष्ठ नगरसेवक सुनील मेश्राम यांनी अनधिकृत मोबाइल टॉवरचा मुद्दा उपस्थित करून रिलायन्स कंपनीचे केवळ कामच थांबवू नका, तर महापालिका क्षेत्रातील त्यांचे सर्व साहित्य जप्त करा, अशी मागणी केली. भारिप-बमसंचे गजानन गवई यांनीही रिलायन्सचे काम बंद करून, करारनामा रद्द करून केबल शहरात नेमकी कशी टाकली जाणार आहे? याचे प्रात्यक्षिक दाखवा, अशी मागणी केली.
प्रतुल हातवळणे यांनी उभारलेल्या मोबाइल टॉवरबाबत प्रशासन नेमके काय करणार? त्यांना दंड आकारता येतो का? टॉवर उभारण्यापूर्वी त्यांनी रीतसर परवानगी मागितली आहे का? आदी प्रश्न उपस्थित केले.

तर विद्युत व्यवस्थेवरही नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. पथदिवे दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण होत नाही. चेकर नियुक्त करूनही महापालिकेला फायदा झालेला नाही. याबाबत आक्षेप घेत, प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले, तर वृत्त लिहिपर्यंत सभा संपलेली नव्हती. शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावरही नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.

अडीच तास खेळखंडोबा

साडेअकरावाजता सभा सुरू झाली. परंतु, विषय पत्रिकेत नसलेल्या विषयांवर चर्चा झाली. ही चर्चा तब्बल अडीच तास चालली. अखेर भारिप-बमसंच्या अरुंधती शिरसाट यांनी आमचा वेळ खर्च करू नका, सभेला प्रारंभ करा, अशी मागणी केली.

समिती या विषयांवर करणार आहे काम

कितीकंपन्यांचे केबल टाकण्याचे काम शहरात सुरू आहे. किती काम पूर्ण झाले आहे? काम जास्त झाले आहे का? झाले असल्यास अधिक महसूल मिळवता येईल का? रस्ते, जलवाहिन्या दुरुस्तीचा नेमका किती खर्च येणार आहे? यावर ही समिती अहवाल सादर करणार आहे.

अन् सभा झाली २० मिनिटांसाठी तहकूब

साडे अकरावाजता सुरू झालेली सभा पाऊण वाजता २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. तहकूब केलेली ही सभा १.२० मिनिटांनी सुरू करण्यात आली. नगरसेवक सुनील मेश्राम यांनी सभा किती वेळ तहकूब करता येते? असा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला भंडावून सोडले.

चौकशी समिती केली स्थापन

रिलायन्ससहविविध कंपन्यांनी केलेल्या कामाचा अहवाल तयार करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे. यामध्ये महापौर, उपमहापौर आणि सर्व गटनेत्यांचा तसेच ज्येष्ठ नगरसेवकांचा समावेश राहणार आहे.

"तमाशा' शब्द मागे घेतो : पठाण

२२एप्रिलला झालेल्या महापालिकेच्या स्थगित महासभेत विरोधकांचे काम सत्ताधारी गटच करत होता. त्यामुळे विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण ‘बंद करो ये तमाशा’ असे सातत्याने आवाहन करत होते. अखेर प्रतुल हातवळणे यांनी या वाक्यावर आक्षेप घेतला. प्रतुल हातवळणे म्हणाले की, महापालिका सभागृहात सभासद आपले मत व्यक्त करत असतात, याला तमाशा म्हणू नये. यावर महापालिकेचे विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण यांनी त्वरित शब्द मागे घेतो, असे सांगून वादावर पडदा टाकला