आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांच्या दिमतीला राहणार कुंभमेळ्यासाठी ६६ बसगाड्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - नाशिक येथे पर्वणीच्या काळात सिंहस्थ २९ ऑगस्टपासून कुंभमेळ्याची सुरुवात होणार आहे. या धार्मिक उत्सवासाठी भाविकांनी जाण्याची तयारी केली असून, प्रशासनही सज्ज झाले आहे. राज्य परिवहन महामंडळाचा बुलडाणा विभागही यासाठी सज्ज झाला असून, कुंभमेळ्या जाणाऱ्या भाविकांसाठी ६६ बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असली तरी खासगी प्रवासी वाहतूकही मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्सद्वारे होत आहे. अशी खासगी प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे नाशिक येथे जाणाऱ्या लाखो भाविकांचा ताण राज्य परिवहन महामंडळावर पडणार आहे. त्या दृष्टीने बुलडाणा विभागानेही बसेसचे नियोजन केले असून, भाविकांसाठी ६६ बसेस आरक्षित केल्या आहेत.

२७ ऑगस्टपूर्वी या सर्व बसेस जिल्ह्यातील वेगवेगळ्या बसस्थानकावरून रवाना होणार आहेत. याशिवाय कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांना सप्तश्रुंगी गड तसेच गणपती उत्सव असा दुहेरी लाभ व्हावा यासाठीही नियोजन सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळ यासाठी २४ तास अविरत सेवा देणार असून, ६६ बसेससाठी ६६ चालक वाहकांची व्यवस्था करण्यात आली आहे. जास्त ताण असल्याने अधिकचे १० टक्के मनुष्यबळ राज्य परिवहन विभागाद्वारे पुरवले जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, मेहकर, खामगाव, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद येथे आगार आहेत.दरम्यान, सद्य:स्थितीत पंढरीची वारी करण्यासाठी भाविकांनी तयारी चालवली असून, त्यानंतर कुभमेळ्यासाठीच्या तयारीलाही वेग येणार आहे.

भाविकांनी सुविधेचा लाभ घ्यावा
नाशिक परिसरात फिरण्यासाठी भाविकांना पाच लाख पासेसची सुविधा देण्याचे उद्दिष्ट आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न महामंडळ करत आहे. भाविकांनी सुविधांचा लाभ घ्यावा. नितीनमैद, विभाग नियंत्रक, बुलडाणा.

खासगी वाहतुकीवर १०० टक्के नियंत्रण
राज्यपरिवहन महामंडळाला या सोहळ्यातून अधिकाधिक उत्पन्न मिळावे, प्रवाशांना कोठलाही त्रास होऊ नये. यासाठी खासगी वाहतूक १०० टक्के बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक मैंद यांनी दिली.

जिल्ह्यात जाणवणार बसेसचा तुटवडा
कुंभमेळ्यानिमित्त जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या ६६ बसेस एकाच वेळी कमी झाल्याने उर्वरत गाड्यांवर ताण पडणार आहे. बसेस पाठवण्याचे नियोजन असले तरी अद्याप परतीचे नियोजन नाही. शिवाय गणेशोत्सवाच्या काळात या बसेस त्याच ठिकाणी राहणार असल्याने जिल्ह्यात बसेसचा तुटवडा जाणवणार आहे.

नाशिक येथील कुंभमेळ्याच्या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त बसेस सोडण्यासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीवर याचा परिणाम दिसून येणार आहे. दुसरीकडे राज्य परिवहन महामंडळाला मोठे आर्थिक उत्पन्न प्राप्त होणार आहे.

हरित कुंभमेळा
कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ हिरवळीचा हिरवा रंग या बसेसला देणार असून, तूर्त तसे नियोजन सुरू आहे. २७ ऑगस्टपूर्वी पूर्ण रंगरंगोटी करून या सर्व बसेस रवाना होणार आहेत. "हरीत कुंभमेळा' असे घोषवाक्य यासाठी ठेवण्यात आले आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी रंग देण्याच्या कामाला लागले आहेत. अद्यापपर्यंत तरी हिरवी बस रंगवून बाहेर आली नाही.