आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलपाखरांच्या 70 प्रजातींचा मुक्तसंचार पाहण्याची अकोलेकरांना संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- मान्सूनच्या आगमनामुळे फुलपाखरांच्या 70 प्रजातींचे निरीक्षण करण्याची संधी अकोलेकरांना उपलब्ध झाली आहे.

क्रीमसन रोझ, कॉमन रोझ, डॅनाईड एगफ्लायसारख्या महत्त्वपूर्ण प्रजातींसह ग्रास येलो, कॉमन येलो, मॉटेल येलो, लाईम बटरफ्लाय, कॉमन क्रो यांचा यात समावेश असून, हिरवळीवर फुललेल्या रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यावर बागडणारी फुलपाखरे सध्या सार्‍यांचे लक्ष वेधत आहेत. जगभरात अस्तित्वात 15 लाख सजीवांच्या प्रजातींपैकी आठ लाख प्रजाती केवळ किटकांच्या आहेत. फुलपाखरे आणि पतंगांच्या संख्या त्यात एक लाख 40 हजारांवर आहे.

देशात एक हजार 501 फुलपाखरांची नोंद आहे. नजरेत भरणारे फुलपाखरू हे सहा पायांचे कीटक या प्रकारात मोडतात. अंडी, सुरवंट, कोश त्यानंतर फुलपाखरू असे त्याचे जीवनचक्र आहे. मेळघाट, सातपुडा पर्वतरांग, काटेपूर्णा अभयारण्य, वान अभयारण्यात फुलपाखरांचे दर्शन घडेल. अकोलेकरांना अगदी घरानजीकच्या बागेत, मोकळ्या माळरानांवर कृषी विद्यापीठाच्या परिसरात फुलपाखरांचे निरीक्षण करता येईल.

कायद्यानेही संरक्षण
फुलपाखरांना कायद्यानेही संरक्षण मिळालेले आहे. त्यांना पकडण्यावर तसेच मारण्यावर तसेच इजा करण्यावर बंदी आहे. शेड्युल वनमधील फुलपाखरांसाठी तर मोठय़ा शिक्षेची तरतूद आहे. आपल्या भागात डॅनाईड एगफ्लाय, क्रीमसन रोझ सारखी शेड्युल वनमधील फुलपाखरे सहज दिसतात. अमरावती विद्यापीठानजीक सामाजिक वनीकरण विभागाने बटरफ्लाय पार्क निर्माण केला असून, तेथे 25-27 प्रकारची फुलपाखरे सहज दिसतात. नागपूर नजीकही एक बटरफ्लाय पार्क प्रस्तावित आहे. याचा निश्चितच फायदा होईल.’’
- देवेंद्र तेलकर, मानद वन्यजीव रक्षक

बटरफ्लाय पार्कची गरज
अति उष्णतामानामुळे विदर्भात फुलपाखरांची संख्या कमी असली तरी मेळघाट, गोंदिया, गडचिरोलीसारख्या प्रदेशात त्यांची संख्या बरी आहे. विदर्भात शेत परिसरातही कॉमन रोझ, क्रीमसन रोझ सारखी फुलपाखरे आढळतात. सातपुड्यात ऑरेंज ओकलीफ, ब्ल्यू ओकलीफची नोंद आहे. त्यांच्या संवर्धनासाठी बटरफ्लाय पार्कसारखी संकल्पना नवसंजीवनी ठरू शकते. यासाठी वन विभागाचा पुढाकार आवश्यक आहे.’’
-डॉ. जयंत वडतकर, फुलपाखरू तज्ज्ञ

फुलपाखरांचे महत्त्व
निसर्गाच्या अन्नसाखळीत फुलपाखरू महत्त्वाची भू्मिका बजावते. पक्ष्यांच्या अनेक प्रजातींचे प्रजन आणि जीवन त्यांच्यावर अवलंबून आहे. वेडाराघू, कोतवाल, बुलबुल यासारखे अनेक पक्षी फुलपाखरांवर आपले पोट भरतात. त्यासोबतच परागीकरणाचे महत्त्वाचे काम फुलपाखरे करतात. निसर्ग स्वस्थ असल्याचे द्योतक फुलपाखरे असतात.