आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ दिवसांच्या मुलीचे पितृछत्र नियतीने हिरावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - गुण्या गोविंदानेनांदणाऱ्या घुगे परिवारात एका चिमुकलीचा जन्म झाल्याने आनंदात असलेल्या या परिवारावर काळाने आघात घालून त्यांच्या आनंदावर विरजण घातले आहे. आठ दिवसांच्या या चिमुकलीचे वडील मंगळवारी दुचाकी अपघातात मृत्युमुखी पडल्याने तिच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतीकनगरमध्ये राहणाऱ्या मूळचे वाशीम जिल्ह्यातील मालेगावचे रहिवासी असलेल्या रामकृष्ण नामदेवराव घुगे वय ३५ हे आपल्या एमएच ४५ जी ५६२० या क्रमांकाच्या दुचाकीने आज दुपारी साडेचार वाजता घरून बाहेर जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, गौरव रमेश कराळे वय १९ आणि अक्षय गजानन वानखडे वय १५ हे मूर्तिजापूर शहरातून पिंजर या आपल्या गावाकडे एमएच ३० एएम ६७६२ या क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना बायपासवरून शहरात जाणाऱ्या मुख्य मार्गावरील प्रतीकनगरजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये रामकृष्ण घुगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना मूर्तिजापूरच्या आपत्कालीन पथकाने रुग्णवाहिकेतून शहरातील सामान्य रुग्णालयात दाखल केले. दोघा जखमींना तत्काळ अकोला येथे रेफर केले. मृतक घुगे हे वन विभागात दरोगा या पदावर कार्यरत आहेत. त्यांची पत्नी नागपूर येथे शिक्षिका आहेत. मात्र, डिलिव्हरीमुळे त्या सध्या मूर्तिजापूर येथे राहत होत्या. पत्नीने बाहेर जाण्यासाठी नकार दिल्यानंतर रामकृष्ण घुगे हे दुचाकीने दुपारी साडेचार वाजता प्रतीकनगरातून निघाले होते. मात्र, हाकेच्या अंतरावर हा अपघात घडला. या घटनेची भणक त्यांच्या पत्नीला लागली होती, परंतु दुसऱ्या कुणाचा अपघात झाला असावा असे समजून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. घुगे यांच्या खिशामध्ये मिळालेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख लगेच पटली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश पिंपळे हे रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी घुगे यांच्या घरी जाऊन किरकोळ अपघात झाल्याची माहिती दिली. आठ दिवसांच्या बाळाकडे पाहून आमदार पिंपळे यांनी सत्य सांगितले नाही. घुगे यांच्या पत्नीची समजूत काढली. मात्र, घुगेेंच्या नातेवाइकांना सत्य माहिती देऊन घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले. या घटनेप्रकरणी आपत्कालीन पथकातील सुनील लशुवाणी, किरण महामुने, अमोल खंडारे, राहुल बोरगावकर, इमरान खान, संतोष भांडे यांनी मदत केली.
रामकृष्ण घुगे

चिमुकलीकडे पाहून अश्रू झाले अनावर
रामकृष्णघुगे यांच्या पत्नीची आठ दिवसांपूर्वीच डिलिव्हरी झाली होती. तेच बाळ आज आठ दिवसांचे होत नाही, तोच आठशे फुटांच्या अंतरावर त्याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याचे पाहून प्रत्यक्षदर्शींनाही आपले अश्रू अनावर झाले होते.