अकोला - कृत्रिमरीत्या आंबा पिकवून त्याची बाजारात विक्री करणार्या व्यापार्याविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम उघडली आहे. सोमवारी, 5 मे रोजी सायंकाळी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी अकोट येथे एका आंबा विक्रेत्याच्या गोदामावर छापा टाकून कार्बाइडने पिकवलेला 836 किलो आंबा जप्त करून नष्ट केला आहे.
कच्चा आंबा स्वस्त दरात विकत घेऊन तो रासायनिक पावडरच्या मदतीने पिकवून जनतेच्या जीवाशी खेळणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. त्यानुसार, अकोला अन्न प्रशासनाने पहिली कारवाई बाळापूर येथे केली. दुसरी कारवाई अकोट येथील मच्छी मार्केट येथील खान फ्रूट कंपनीवर केली. अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे यांच्या नेतृत्वामध्ये मुजामिल खान यांच्या खान फ्रूट कंपनीवर छापा टाकण्यात आला. त्यामध्ये कार्बाइडने पिकवलेला सुमारे 16 हजार 720 रुपयांचा हा आंबा अकोट नगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंडमध्ये नष्ट करण्यात आला. या आंब्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरवर्षींच्या तुलनेत यंदा आंब्याचे भावही कमी आहेत. रासायनिक पावडरने पिकवलेला आंबा आरोग्यास धोकादायक आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा नियम 2006 व नियमन 2011 नुसार कार्बाइड पावडरचा वापर करून आंबा पिकवण्यास प्रतिबंध आहे.