आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदा, 'आप' ची अकोल्‍यात जाहीर सभा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ‘पुढारी, पक्षांनी भ्रष्टाचार निर्माण केला आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ हे पुढा-यांमुळे भ्रष्ट झाले आहेत. राजकारणातून पैसा आणि त्यातून सत्ता, अशी अवस्था निर्माण झाली आहे. भ्रष्टाचाराची घट्ट झालेली पाळेमुळे हराळीसारखी खणून काढण्याची गरज आहे,’असे आवाहन सिंचन विभागाचे माजी अभियंता विजय पांढरे यांनी केले. आम आदमी पार्टीच्या डॉ. आंबेडकर खुले नाट्यगृहात मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
आम आदमी पार्टीने लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल आजच्या सभेत फुंकला. आम आदमी पार्टी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगून विजय पांढरे यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतले. राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. राष्‍ट्रवादीचे मंत्री जनतेला खोटी माहिती देत आहेत. 17 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली असताना 47 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली असल्याचे सांगितले जात आहे. अधिका-यांच्या घरात छापे टाकले तर कोट्यवधींची संपत्ती सापडेल, मात्र अशा अधिका-यांना पुढारी संरक्षण देत आहेत. अरुण बांठिया समितीने सिंचन विभागाची चौकशी केली होती. यामध्ये 110 अभियंते दोषी आढळले होते. मात्र, या दोषींवर सरकारने कारवाई केली नाही. अपूर्ण प्रकल्पांचा खर्च दहा वर्षांत कितीतरी पटीने राष्‍ट्रवादीच्या आशीर्वादाने वाढला आहे, असे पांढरे म्हणाले.
नेते मंचावर नव्हे, तर जनतेमध्ये बसले
आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया, विजय पांढरे हे सभा सुरू होण्याअगोदरच आम जनतेत बसून होते तसेच हारफुलांनी कुणाचेही स्वागत करण्यात आले नाही. फुले ही देवालाच वाहायची असतात. नेत्यांना वाहून त्यांचा अवमान करू नका. या पक्षामध्ये कुणी नेता नाही, तर तो आम आदमीच आहे, असे दमानिया म्हणाल्या.
राष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते आपच्या सभेला :
ज्या राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर विजय पांढरे आणि अंजली दमानिया यांनी सडकून टीका केली त्याच सभेत राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांची सभेला उपस्थिती होती. एका कार्यकर्त्याने विजय पांढरे यांना चरणस्पर्शसुद्धा केला.
पांढरेंनी नाकारली दोन वेळेस टोपी :
विजय पांढरे हे भाषणासाठी जाताना कार्यकर्त्याने त्यांना टोपी घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी नकार दिला. पुन्हा एकदा भाषणासाठी ते उभे असताना दुसºया कार्यकर्त्याने त्यांना टोपी घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तेव्हाही त्यांनी नकार दिला.
अण्णांना ‘आप’च्या विरोधात भडकावण्याचा भाजपचा प्रयत्न :
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आम आदमी पार्टीच्या विरोधात भडकावण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे, पण आता हे षड्यंत्र अण्णांच्याही लक्षात येत आहे, असा आरोप आम आदमी पार्टीच्या राज्याच्या संयोजिका अंजली दमानिया यांनी या वेळी केला. भाजपने राळेगणसिद्धी येथे एका वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधीला पाठवून आम आदमी पार्टीच्या विरोधात अण्णांना भडकावण्याचे षड्यंत्र चालवले आहे. त्यामुळे अण्णांनी दिल्लीच्या निवडणुकीमध्ये त्यांचा वापर न करण्याचे पत्र अरविंद केजरीवाल यांना पाठवले होते. त्याचा परिणाम दिल्लीच्या निवडणुकीवर दिसून आला, अन्यथा दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या 40 जागा निवडून आल्या असत्या, असे सांगून अंजली दमानिया म्हणाल्या की, आयकर विभागात चपराशी असणार्‍या नारायण राणे यांची आज काय स्थिती आहे, याचा विचार जनतेने करावा, तसेच राजेश टोपे, सुनील तटकरे यांच्याकडे शिक्षण संस्था आणि शेकडो एकर जमिनी कशा काय आल्या, यावर जनतेने विचार करावा. अकोल्यामध्ये नऊ आमदार आहेत, पण अकोल्याची ओळख खड्डय़ांचे शहर म्हणून होत आहे. याबाबत त्यांना कधी जाब विचारणार की नाही? आता आंदोलने रस्त्यावर करायची नाहीत, तर विधानसभा आणि संसदेत करायची आहेत. त्यासाठी आम आदमी पार्टीच्या पाठीशी उभे रहा. कुणाची टिंगलटवाळी करून राजकारण करणे चुकीचे आहे.
सहा वर्षात ‘मनसे’ने काय केले, नाशिकचा बट्टय़ाबोळ ‘मनसे’ने केला आहे, असेही त्या म्हणाल्या. या वेळी ज्येष्ठ वर्‍हाडी कवी डॉ.विठ्ठल वाघ यांनी कविता सादर करून आम आदमी पार्टीच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक गजानन हरणे यांनी या वेळी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बळी यांनी केले.