आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhitejasinga Sandhu, Latest News In Divya Marathi

व्यवस्था परिवर्तनाचा लढा युवकांनी लढावा- अभितेजसिंग संधू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- स्वातंत्र्याचा लढा आम्ही जिंकलो. पण, व्यवस्था परिवर्तनाची लढाई अजूनही सुरूच आहे. 10 टक्के धनिकांकडून देशात 90 टक्के लोकांचे शोषण सुरू आहे. याविरुद्ध देशातील युवकांना लढा द्यावा लागेल. प्रस्थापित व्यवस्थेतून दबल्या-पिचलेल्यांना न्याय मिळणे अशक्य आहे, असे स्पष्ट मत शहिदेआजम भगतसिंग यांचे पणतू अभितेजसिंग संधू यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केले.
‘वंदन क्रांतिकारियोंको’ कार्यक्रमासाठी ते अकोल्यात आले होते. त्या वेळी एका हॉटेलमध्ये त्यांनी देशाच्या सद्य:स्थितीविषयी आपले मत मांडले. युवकांनी भावनेचा नाही, तर विचारधारेचा लढा लढला पाहिजे, असे सरदार भगतसिंग यांचे म्हणणे होते, असे सांगून अभितेजसिंग म्हणाले की, इतिहासाचे स्मरण ठेवून नवा इतिहास लिहिण्यासाठी आम्ही सर्वांनी सज्ज असले पाहिजे. कारण विचार कधीच संपत नाहीत. वैचारिक लढा कायम सुरू असतो.
युवकांमध्ये व्यवस्थेविरुद्ध चीड दिसून येते. प्रसंगी राग व्यक्तदेखील होतो. परंतु, आवेशालाही योग्य दिशा देण्याची गरज आहे. नेल्सन मंडेला यांच्याकडून आमच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी. भगतसिंग यांनी कारागृहात अन्नत्याग आंदोलन केले होते. वयाच्या 23 व्या वर्षी त्यांच्या आंदोलनाने स्वातंत्र्यलढय़ाला वळणे दिले होते. तसाच निर्धार, रोष आताही व्यक्त झाला पाहिजे. त्याशिवाय परिस्थिती बदलू शकणार नाही, असे अभितेजसिंग म्हणाले.
सरदार कुलदीपसिंग वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांमध्ये जागृती आणण्याचे कार्य सुरू आहे. तीन महिन्यांपूर्वी जिनेव्हा येथे झालेल्या युवा मानवाधिकार परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला मिळाली होती. 24 राष्ट्रांचे प्रतिनिधी त्यात सहभागी होते. विविध देशांमध्ये मानवाधिकाराची स्थिती काय आहे, याविषयी परिषदेत चर्चा झाली. भारतात र्शीमंतासाठी वेगळे आणि गरिबांसाठी वेगळे कायदे असल्याचे जाणवते. इतकेच नाही तर भारत आणि इंडियामध्ये प्रचंड दरी निर्माण झाली आहे. काही मोजके लोक देशाच्या मोठय़ा वर्गाला खितपत ठेवण्यात धन्यता मानत आहेत. लोकांना फुकट अन्न देऊन भिकारी करण्यापेक्षा त्यांना स्वाभिमानी बनवावे. परंतु, काही राजकीय पक्ष स्वार्थासाठी गरिबांना गरीब, अशिक्षित ठेवण्यातच धन्यता मानतात. हे चित्र बदलावेच लागेल, असेही अभितेजसिंग यांनी सांगितले.