आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्लासेसच्या जाहिरातींमध्ये परवानगीविनाच छायाचित्रे; राष्ट्रीय स्तरावरील लेखक, अभिनेते दिसतात फलकावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - शाळांमध्ये बहुतांश शिक्षक गांभीर्याने अध्यापनकार्य करत नसल्याने त्याचा फायदा खासगी क्लासेसच्या संचालकांनी उचलला आहे. त्या पाठोपाठ खासगी क्लासेसचे संचालक जाहिरातींच्या माध्यमातून आपला विस्तार वाढवत आहेत. जिल्ह्यातील अनेक क्लासेसचे संचालक जाहिरात फलक व प्रसिद्धीपत्रकावर विदयार्थ्यांची छायाचित्रे परवानगीविना प्रसिद्ध करत असल्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अशा फलकांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नसल्याने या प्रकारावर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.

बुलडाणा शहरात आणि जिल्ह्यात मागील काही काळापासून खासगी शिकवणी क्लासेसची संख्या वाढली आहे. बेरोजगारीला कंटाळून अनेकांनी हा व्यवसाय सुरु केला आहे. असे काही क्लासेस विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्धही झाले आहे. काही क्लासेसच्या संचालकांचे थेट शाळेतील शिक्षकांसोबतच संबंध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संपर्क त्या क्लाससोबत आपोआपच येत आहे. शहरातील विविध भागात खासगी क्लासेस चालवले जात आहेत. आता तर इयत्ता पहिलीपासूनही क्लासेस सुरु आहेत. काही क्लासेस मुलांचे ‘टॅलेंट सर्च’ करण्यासाठी आपलेअतिरिक्त ‘टॅलेंट’ खर्ची घालताना दिसत आहेत.

आपल्या क्लासेसमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा या उद्देशाने संचालक शहरातील विविध भागांमध्ये मोठमोठे जाहिरात फलक लावत आहेत. त्यावर परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे स्पष्ट दिसली पाहिजेत, नाव, गुण आणि विषयाचा समावेश असला पाहिजे या बाबींवर भर दिला जात आहे. अशा फलकांच्या माध्यमातून खासगी क्लासेसच्या जाहिराती केल्या जात आहेत. साधारणत: क्लासमध्ये प्रवेश घेताना विद्यार्थ्यांची छायाचित्रे दिली जातात. त्याच छायाचित्रांचा वापर जाहिरात फलकावर लावण्यासाठी केला जात आहे. याबाबत विद्यार्थी व पालकांना कोणतीही माहिती संचालकांकडून दिली जात नाही. खासगी क्लासेसचे संचालक विद्यार्थी किंवा पालकांची परवानगी न घेताच छायाचित्रांचा जाहिरात फलक व प्रसिद्धीपत्रकांवर वापर करत असल्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
छायाचित्र लावण्यासाठी द्यावा मोबदला
खासगी क्लासेसच्या संचालकांकडे काही विद्यार्थी शुल्काची रक्कम थकीत ठेवत असतात, काही जण शुल्क बुडवतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे जाहिरात फ लकावर लावण्यात येतात, अशा जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी शुल्क दिलेले असते. याचप्रमाणे क्लासेसच्या जाहिरातीत छायाचित्र वापरण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना संचालकांनीही आर्थिक स्वरुपात मोबदला देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया पालकांकडून दिली जात आहे.

जाहिरात फलकावर महानायक
एका इंग्रजी क्लासेसच्या संचालकाने क्लासेसची जाहिरात प्रोग्रेसिव्ह होण्यासाठी सुरुवातीला शिवखेरा यांचे छायाचित्र जाहिरात फलकावर वापरले. त्यानंतर धीरुभाई अंबानी यांचेही छायाचित्र प्रसिद्ध केले. त्या पाठोपाठ महानायक अमिताभ बच्चनच्या छायाचित्राचाही वापर त्या क्लासच्या संचालकाने केला आहे. शहरात काही ठिकाणी असे जाहिरात फलक लावण्यात आले आहेत.