अकोला- महाराष्ट्र कुंभार समाज विकास परिषद व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणास आज 4 मार्चला भारिप-बमसंचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर तसेच आमदार बळीराम सिरस्कार यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. 3 मार्चपासून आमदार हरिदास भदे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे साखळी उपोषण सुरू आहे.
कुंभारांना ई-क्लास जमीन व्यवसायासाठी अस्थायी स्वरूपात मिळावी तसेच समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन होत आहे. कुंभार जातीचा एन.टी. प्रवर्गात समावेश करावा, कुंभारांना विटा व्यवसायासाठी शासकीय ई-क्लास जमीन मोफत देण्यात यावी, कुंभारांना विटा व्यवसायासाठी जमीन नॉन अँग्रीकल्चर करावी व प्रदूषणाची अट रद्द करावी, त्यांना हटवल्यास पर्यायी जागा द्यावी, कुंभार व्यावसायिकाने दिलेल्या अर्जावर त्वरित निर्णय घेऊन व्यवसायाची परवानगी द्यावी तसेच कुंभार व्यावसायिकांना दिलेल्या जप्तीच्या व दंडाच्या नोटीस परत घ्याव्यात या मागण्या ठेवण्यात आल्या आहेत.
आज साखळी उपोषण आंदोलनात जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण साविकर, तालुकाध्यक्ष महादेव लाहुळकर, मंगला घाटोळे, पांडुरंग तळोकार, सुनील साविकर, वसंतराव घाटोळ, शांताराम घुमोने, नारायण इंगळे यांनी भाग घेतला.