आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये नियमबाह्य बियाणे निर्मितीविरुद्ध लढा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- बनावट बियाण्यांनी या हंगामात शेतक-यांना हैराण केले. बियाण्यांची उगवणच झाली नाही, अशी ओरड मोठ्या प्रमाणात झाली. त्यातच अकोटला बनावट बियाणे निर्मिती कारखान्यावर यंत्रणेने छापा मारून बियाणे, लेबल आदी साहित्य जप्त केले. मात्र, सहा महिने होत नाहीत तोच, पुन्हा शेतकऱ्यांना वेठीस धरणारी यंत्रणा डोके वर काढू लागली असल्याने त्याविरुद्ध लढा छेडण्यात येत आहे.
अकोट येथील दुर्गा अॅग्रो इंडस्ट्रिजमध्ये बनावट सोयाबीन बियाणे निर्मिती करण्यात येत असल्याचे आढळून आल्याने १९ जून २०१४ रोजी गुणवत्ता निरीक्षक गिरीश नानोटी यांच्या पथकाने छापा मारला होता. महाराष्ट्रात निर्बंध घालण्यात आलेल्या बियाण्यांची नियमबाह्य निर्मिती हिवरखेड मार्गावरील प्रकल्पामध्ये होत असल्याने तपास अधिकाऱ्यांनी संबंधितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील कार्यवाही संशयास्पद वाटत असल्याने विशेष पथकामार्फत चौकशी व्हावी, तसे झाल्यास न्यायालयात दाद मागू, असे निवेदन अकोट तालुक्यातील मरोडा येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गावंडे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे.
फिर्याद देताना नानोटी यांनी दुर्गा अॅग्रो इंडस्ट्रिजच्या भागीदारांची नावे नमूद केली नाहीत तसेच जप्तीमध्ये ज्या मशीनद्वारे एक हजार क्विंटल बनावट सोयाबीन बियाण्यांची चाळणी करून देण्यात आली होती, ती मशीन सील केली नाही, त्यांची कृती संशयास्पद असल्याचा आरोप गावंडे यांनी केला आहे. कारखान्यातील जप्त केलेला माल त्याच ठिकाणी सील करून ठेवल्याने मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले होते. त्यामुळे तेथे सुरू असलेले गैरप्रकार काही काळ बंद राहिले. जप्ती पंचनाम्याच्या वेळी या प्रकरणातील आरोपी बजरंग अग्रवाल यांनी जप्त केलेले सोयाबीन बियाणे स्थानिक बाजारातून खरेदी केल्याचे सांगितले. बियाणे नाशवंत असल्याने ते हर्रास करण्याची परवानगी नानोटी यांनी एका अर्जाद्वारे न्यायालयाला मागितली. या प्रक्रियेमागेही चौकशी अधिकाऱ्यांचा हेतू शुद्ध दिसत नाही, असा आरोपदेखील विठ्ठल गावंडे यांनी केला आहे. जप्त केलेले बियाणे स्थानिक बाजारातून खरेदी केल्याचे सांगणे तसेच त्याची किंमत प्रमाणित बियाण्यानुसार गृहीत धरणे ह्या बाबीदेखील संशयास्पद आहेत. इतकेच नाही, तर न्यायालयाने जप्त केलेले बियाणे हर्रास करण्याचा आदेश दिला, त्याचा आधार घेऊन कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे सील केलेली कुलपे उघडून जप्त केलेले बियाणे हर्राशीसाठी नेण्यात आले. त्यानंतर मात्र इंडस्ट्रीला सील करता कारखाना उघडा करून देण्यात आला आहे. आरोपींना पुन्हा गैरकृत्ये करण्यासाठी चौकशी अधिकारी संधी देत आहेत का, असा प्रश्नही गावंडे यांनी उपस्थित केला आहे.