आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपहारकर्त्या वाहकांविरुद्ध होणार बडतर्फीची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एसटी महामंडळाच्या उत्पन्नात तोटा येत आहे. यामधील प्रमुख कारण वाहकांकडून होत असलेला अपहार आहे. यावर अंकुश बसून, एसटीला नफ्यात आणण्यासाठी महामंडळाचे मुख्य सुरक्षा दक्षता अधिकारी अग्रवाल यांनी कंबर कसली आहे. अपहार करणाऱ्या वाहकांविरुद्ध बडतर्फीची कारवाई करण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या आर्थिक वर्षामध्ये महामंडळाला ६४५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. संचित तोटा १८३९ कोटींपर्यंत गेलेला आहे. एसटीची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर असताना होत असलेला आर्थिक तोटा महामंडळाच्या जिवावर उठला असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. एसटीचा तोट्यामध्ये वाहकांकडून होत असलेला अपहार हासुद्धा मुख्य विषय ऐरणीवर आलेला आहे. सन २०११ ते २०१५ पर्यंत राज्यातील अपहार प्रकरणांपैकी ५४ हजार ३११ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. त्यातील ४५१ वाहकांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. हजार २३४ प्रकरणांत अशा वाहकांची वेतनवाढ रोखण्यात आलेली आहे. सध्या राज्यात अपहाराची हजार २२६ प्रकरणे दाखल करण्यात आलेली आहेत. अकोला विभागीय कार्यालयांतर्गत ३१५ प्रकरणे सध्या दाखल आहेत. मात्र, अपहार करणाऱ्या वाहकांविरुद्ध सध्या महामंडळात शिस्त आवेदन पद्धतीनुसार कारवाई केल्या जाते. परंतु, न्यायालयाप्रमाणेच या प्रकरणांना विलंब लागतो. शिक्षेमध्ये सुसूत्रता नसल्याने तत्काळ शिक्षेचा निर्णय महामंडळाचे मुख्य सुरक्षा दक्षता अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
सीबीआय शाखेतून एसटी महामंडळामध्ये रुजू झालेले मुख्य सुरक्षा दक्षता अधिकारी अग्रवाल यांनी वाहकांच्या अपहार प्रकरणाबाबतचे परिपत्रक काढले आहे. मार्ग तपासणी पथक किंवा सुरक्षा शाखेला जे वाहक अपहार करताना आढळतील, त्यांच्याविरुद्ध थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ही कारवाई आगार विभागीय कार्यालयाने तीन महिन्यांच्या आत पूर्ण करून, दोषी वाहकांना बडतर्फ करण्याच्या स्पष्ट सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. वाहकांना नैसर्गिक न्याय, संधी द्यावी आणि प्रामाणिक वाहकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. आदेशित केल्याप्रमाणे प्रत्येक वाहकाला या परिपत्रकाची प्रत वितरणाचे काम अकोला विभागातील सुरक्षा दक्षता शाखेच्या वतीने १८ १९ मे रोजी पूर्ण करण्यात आले आहे. विभागातील नऊ आगारांमधील ८७२ वाहकांना या परिपत्रकाची प्रत देण्यात आली. या निर्णयामुळे महामंडळातील कार्यरत वाहक कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
पोलिसांतही दाखल होणार गुन्हा
या परिपत्रकामध्ये २० मे २०१५ नंतर एक किंवा जास्त प्रकरणात वाहकाने अपहार केल्यास त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच कोणत्या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात येईल, याबाबतचे नवीन परिपत्रक लवकरच काढण्यात येईल, असेही या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
चौकशीसाठी तीन महिन्यांचाच कालावधी
वाहकांच्या अपहार प्रकरणांच्या चौकशीसाठी बराच विलंब लागत होता. शिवाय शिक्षेबाबत सुसूत्रता नव्हती. आताच्या निर्णयानुसार असे प्रकरण दाखल झाल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण चौकशी पूर्ण करून, संबंधित वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासोबतच त्याला बडतर्फ करण्याचे कामकाज पूर्ण करावे लागणार आहे. शिवाय जुनी प्रकरणे तत्काळ निकाली काढून कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
प्रामाणिक वाहकांच्या पाठीशी प्रशासन
- एसटीच्या उत्पन्न वाढीची जाणीव वाहकांमध्ये निर्माण व्हावी, आपले कुटुंब याच कार्यावर चालते, ही भावना निर्माण होऊन वाहकांचा ब्रेन वॉश व्हावा, या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वाहकांना यामुळे कोणताच त्रास होणार नसून, त्यांच्या पाठीशी महामंडळ प्रशासन खंबीरपणे उभे आहे.''
एस.बी. क्षीरसागर, विभागीय वाहतूक अधिकारी, अकोला.
बातम्या आणखी आहेत...