आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agricultural Universities Vice Chancellor Of The Leader, I Will Not Be Super Hedamastara Dr. Yashwant Thorat

कृषी विद्यापीठांचे कुलगुरूच लीडर, मी सुपर हेडमास्तर होणार नाही - डॉ. यशवंत थोरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत होणार्‍या निवड व नियुक्तींबद्दलचे संबंधित कुलगुरूंचे अधिकार अबाधित आहेत. विद्यापीठांनी त्यांच्या अधिकाराबद्दल चिंता करण्याची गरज नाही. चारही कुलगुरूंची संयुक्त बैठक घेत सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे कुलगुरू हेच विद्यापीठाचे लीडर आहेत. मी सुपर हेडमास्टर होणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विभाजन समितीचे अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांनी बुधवारी येथे दिली. कृषी विद्यापीठात दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी आले असता, त्यांनी ‘दिव्य मराठी’शी खास बातचीत केली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विभाजन करण्यासाठी समितीच्या बैठका होत असून, निर्णय राज्य शासनाला घ्यावयाचा आहे. समितीचे सचिव आणि इतर सदस्यांनी विभाजनाबद्दल वेगवेगळ्या मॉडेलवर विचार केला. विभाजन केल्यानंतर आणि विभाजन न केल्यास कोणते फायदे-तोटे होणार आहेत, याचा अभ्यास करण्यात येत आहे. कर्मचार्‍यांची संख्या वाढवली तर काय होईल, जे विभाग (डिपार्टमेंट) काही भागात पोहोचले नाहीत, तेथे ती व्यवस्था केल्यास काय फरक पडेल, आउट पोस्ट वाढवण्याची गरज आहे काय, याची चाचपणी होत आहे. येत्या पंधरा दिवसांनी याविषयी दोन दिवसीय बैठक होणार असून, समिती आपला अहवाल सादर करेल, असे डॉ. थोरात यांनी सांगितले.
सहावा वेतन आयोग विद्यापीठांना लागू झाला आहे. त्या वेळी विद्यापीठांनी काही मुद्दे मान्य केले होते. त्यानंतर विद्यापीठांनी क्वालिटी कंट्रोल सेल विद्यापीठ स्तरावर निर्माण करण्याचे मान्य केले. चाचण्या, पदे, पेपर त्या सेलच्या माध्यमातून करण्यात येतील. राज्यातील सर्वच विद्यापीठांत 17 फेब्रुवारीच्या आत क्वालिटी कंट्रोल सेल स्थापन होतील. कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची ही जबाबदारी असेल की, त्यांनी छाननी, परीक्षा आणि त्यानंतर यादी तयार करावी, त्यास अंतिम मान्यता देण्याचे काम निवड समिती करेल. न्या. धाबे आयोगाने नियुक्तीसंदर्भात दिलेला निर्णय पाहून तो अमलात आणावा लागेल. चार कुलगुरू आणि निवड समितीचे अध्यक्ष, असे आम्ही एकत्र बसून नियुक्ती आणि निवडीसंदर्भात निर्णय घेऊ व एक प्रक्रिया ठरवणार आहोत. महाराष्ट्र कृषी अनुसंधान व विकास परिषद ही विद्यापीठांना निवडीसाठी मदत करण्यासाठी आहे.
विद्यापीठाच्या स्वातंत्र्याला कुठल्याही स्थितीत धक्का लागू देणार नाही. विद्यापीठांचे स्वातंत्र्य अबाधित राहील, अशी नि:संदिग्ध ग्वाही त्यांनी दिली. कुलगुरूंनी यादी द्यावी आणि त्यांनी नियुक्तीची जबाबदारी स्वीकारावी. कृषी विद्यापीठाची स्थानिक स्थिती त्यांना माहीत असते. त्यामुळे तेच विद्यापीठाचे लीडर आहेत, मी सुपर हेडमास्टर राहणार नाही. आम्ही नियुक्त्या एकत्र करू. सर्वांचे पदनिहाय वेतन समान राहील, याविषयीचा निर्णय घेऊ. निवड मंडळ नियामक (रेग्युलेटरी) म्हणून काम करणार नाही. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू व निवड समितीचे अध्यक्ष या नात्याने आम्ही एकत्र काम करू. त्यामुळे समस्या राहणार नाहीत.
अन्यथा, कडधान्ये व डाळी नसतील
कोरडवाहू शेतीसाठी दोन हजार कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचा योग्य विनियोग करावा लागेल. कोरडवाहू क्षेत्रात या निधीचा वापर झाला नाही, तर 2020 पर्यंत कडधान्य आणि डाळींचा पुरवठा आपण करू शकणार नाही. यासाठी कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे, असे मत डॉ.थोरात यांनी व्यक्त केले.