आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यातील 13 शेतकरी कृषी पुरस्काराचे मानकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्हा परिषदेच्या वतीने हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची 1 जुलै रोजी साजरी होणारी जयंती ही कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. या अनुषंंगाने जिल्ह्यातील आधुनिक तंत्राद्वारे शेती करणार्‍या शेतकर्‍यांची निवड करून त्यांना कृषी पुरस्कार दिला जातो. यंदा या पुरस्कारासाठी 13 शेतकर्‍यांची निवड करण्यात आली असून, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

जिल्ह्यात शेती विकासात संशोधनात्मक काम करणार्‍या शेतकर्‍यांचा सन्मान व्हावा व त्यातून इतर शेतकर्‍यांना प्रेरणा मिळावी, याकरिता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून हा उपक्रम राबवला जातो. या पुरस्कारासाठी तालुका स्तरावर प्रगतिशील शेतकर्‍यांचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार 17 पुरुष व 3 महिला शेतकर्‍यांनी आपले प्रस्ताव पाठवले होते. 24 जून रोजी या प्रस्तावाची पडताळणी करून पात्र शेतकर्‍यांची निवड या वेळी करण्यात आली. निवड झालेल्या शेतकर्‍यांना 1 जुलै रोजी आयोजित कृषी दिन कार्यक्रमात ग्रामविकासमंत्री ना. जयंत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी कार्यक्रमास खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात घेतला जाणार आहे. या कार्यक्रमाला शेतकर्‍यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती लक्ष्मी नरेश शेळके यांनी केले आहे.
पाच सदस्यीय समितीने केली शेतकर्‍यांची निवड
जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणार्‍या या पुरस्कारासाठी पाच सदस्यीय समितीच्या वतीने शेतकर्‍यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत कृषी व पशुसंवर्धन सभापती यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सदस्य सचिव कृषी विकास अधिकारी यांचा समावेश होता.
असे आहे पुरस्काराचे स्वरूप
कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकर्‍यांना दोन पुरस्कार प्रदान केले जातात. एक पुरस्कार हा कै. वसंतराव नाईक प्रगतिशील शेतकरी पुरस्कार आहे. या पुरस्काराचे स्वरूप 11 हजार रुपये, सन्मानपत्र असे आहे. दुसरा पुरस्कार हा राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी पुरस्कार आहे. या पुरस्काराचे स्वरूपदेखील 11 हजार रुपये, सन्मानपत्र असे आहे, तर प्रत्येक तालुक्यातील एका शेतकर्‍यास राष्ट्रमाता जिजाऊ सन्मान पत्राने गौरवण्यात येते.

दोघांची रोख रकमेच्या पुरस्कारासाठी निवड
कै. वसंतराव नाईक प्रगतिशील शेतकरी पुरस्कारासाठी जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव पाटण येथील तेजराव पाटील यांची निवड करण्यात आली, तर राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी पुरस्कारासाठी सिंदखेडराजा तालुक्यातील बाळ समुद्र येथील रुक्मिणा जगन्नाथ मेरत यांची निवड करण्यात आली.
11 शेतकर्‍यांची राष्ट्रमाता जिजाऊ सन्मानपत्रासाठी निवड
रामदास दांडगे दहीद ता. बुलडाणा, आशा घाडगे सातगाव भुसारी ता. चिखली, विजय पळसकर डोणगाव मेहकर, बाजीराव वाघ पांग्री ता. देऊळगावराजा, दिलीप मेहेत्रे नसिराबाद ता. सिंदखेडराजा, दिलीप नाफडे तळणी ता. मोताळा, प्रमोद वराडे नरवेल ता. मलकापूर, रामकृष्ण पाटील पोटा ता. नांदुरा, संजय ठोंबरे कोन्टी ता. खामगाव, जया गोळे वरुड ता. शेगाव, अरुण गाळकर वरवंट खंडेराव ता. संग्रामपूर आदींचा समावेश आहे.