आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture University Survey : Index Related Agricultural In Trouble

कृषी विद्यापीठाचा सर्व्हे: शेतीविषयक अडचणींचा निर्देशांक चिंताजनक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विदर्भातील शेतकर्‍यांमध्ये शेतीविषयक अडचणींचा निर्देशांक चिंताजनक आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विस्तार शिक्षण विभागाच्या चमूने याबाबतचा सर्व्हे करून विदर्भातील शेतकर्‍यांची विपदा स्थिती कमी होण्याच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण बदलात्मक उपाययोजनांच्या शिफारशी शासनाला सादर केल्या आहेत.
परभणी येथे 5 फेब्रुवारीला झालेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 2013 च्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीसमोर ‘विदर्भातील शेतकर्‍यांच्या शेतीविषयक अडचणींसाठी कारणीभूत असलेल्या घटकांचा अभ्यास’ या संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करून सदर संशोधन प्रकल्पाच्या निष्क र्षाच्या आधारावर विदर्भातील स्थिती बदलण्याच्या दृष्टीने शिफारस मंजूर केली. या शिफारशी मंजुरीसह समितीमार्फत शासनाला पाठवल्या आहेत. या संशोधन प्रकल्पासाठी विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ व वर्धा या सहा जिल्हय़ांमधून प्रत्येकी 4 गावे रॅण्डम पद्धतीने निवडून एकूण 24 गावांतील 240 शेतकर्‍यांच्या घरी जाऊन सविस्तर मुलाखती घेतल्या. मुलाखती घेतलेल्या शेतकर्‍यांमध्ये 120 शेतकरी हे 5 एकरांपेक्षा कमी शेतजमीन असलेले व 120 शेतकरी हे 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन असलेले होते. संशोधनासाठी निवडलेल्या शेतकर्‍यांसाठी वैयक्तिक माहितीसह शेतकर्‍यांना शेती व्यवसायात अडसर ठरलेल्या एकूण 16 बाबींवर माहिती जाणून घेण्यात आली.
प्रत्येक बाबींचा सरासरी असाह्यतेचा गुणांक व एकूण 16 बाबींचा संयुक्तिक शेतीविषयक अडचणींच्या असाह्यतेचा निर्देशांक काढून व निवड केलेल्या शेतकर्‍यांचे शेतीविषयक अडचणींच्या असाह्यतेच्या निर्देशांकानुसार निम्न, मध्यम व उच्च र्शेणी या वर्गवारीत विभागणी करून शास्त्रीय पद्धतीने निष्कर्ष काढले. सन 2012-2013 मध्ये सोयाबीन पीक घेतलेले 91.25 टक्के शेतकरी, कडधान्य पीक 88.75 टक्के, कापूस पीक 42.92 टक्के, तृणधान्य पीक 24.17 टक्के, फळे, भाजीपाला पीक 10.83 टक्के, फूल पीक 1.67 टक्के, औषधी वनस्पती पीक 0.83 टक्के अशाप्रकारे शेतकर्‍यांनी पिके घेतलेली आढळली. 22.08 टक्के शेतकरी थकितदार असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांना पुन्हा कर्ज मिळू शकले नाही, तर 22.08 टक्के शेतकर्‍यांना थकितदार असल्याने पीक कर्ज योजनेचा फायदा न घेता आल्याचे दिसून आले.
विदर्भातील विपदा परिस्थितीच्या जिल्हय़ात केलेल्या अभ्यासानुसार समितीला बहुसंख्य शेतकर्‍यांचा (99.58 टक्के) शेतीविषयक अडचणींच्या असाह्यतेचा निर्देशांक जास्त प्रमाणात (0.66 टक्के) पेक्षा जास्त असल्याचे आढळले. कृषी विद्यापीठाच्या समितीत प्रा. डॉ. नारायण काळे, विभागप्रमुख डॉ. दिलीप मानकर, सहायक प्रा.डॉ. पुष्कर वानखडे यांचा समावेश होता.
सुचवलेले उपाय
> शेतमालाला किफायतशीर बाजारभाव द्यावा.
> वेळेवर व कमी खर्चात शेतीविषयक निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात.
> शेत कुंपणाकरिता अनुदान देणे.
> सिंचनाची व्यवस्था करून देणे.
> ट्रॅक्टर खरेदीसाठी जास्त अनुदान द्यावे.
> प्रत्येक नाल्यावर सिमेंट प्लग बांधावा.
> शेतीकरिता दिवसा वीजपुरवठा द्यावा.
> शासकीय योजना व कृषी तंत्रज्ञानाबद्दल माहिती द्यावी.
> पीक विमा जोखमीचे मूल्यांकन गावपातळीवर व्हावे.
> शेतकर्‍यांना अधिक फायदा मिळण्याकरिता त्यांच्या शेतमालाचे निर्यातीस चालना द्यावी.
वार्षिक उत्पन्न
50 हजार रुपये : 32.92 टक्के
50 ते 1 लक्ष रुपये : 23.75 टक्के
1 ते 2 लक्ष रुपये : 23.33 टक्के
2 ते 4 लक्ष रुपये : 11.67 टक्के
4 ते 8 लक्ष रुपये : 6.25 टक्के
8 लक्ष रुपये : 2.08 टक्के