आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळ विस्तारीकरण, की विद्यापीठ विद्रुपीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी पूर्वेकडील जागाच योग्य असल्याचा निर्वाळा देत, सध्याच्या पश्चिमेकडील विस्तारीकरणाच्या प्रस्तावामुळे कोट्यवधींचे मूल्य असलेला विद्यापीठाचा परिसर नेस्तनाबूत होणार आहे. त्यामुळे शिवणी विमानतळाचे विस्तारीकरण राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजूकडे जाणार्‍या पूर्वेकडील जागेवरच व्हावे, असे मत विद्यापीठाच्या चार माजी कुलगुरूंनी व्यक्त केले आहे. विमानतळाचे विस्तारीकरण नव्हे, तर हा विद्यापीठाच्या विद्रुपीकरणाचा घाट असल्याचा आरोप माजी कुलगुरूंनी केला.
विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी पश्चिमेकडील जमीन लागेल, असे संकेत प्रशासनाने यापूर्वी दिले नव्हते. पश्चिमेकडील 60 हेक्टर परिक्षेत्रामध्ये विद्यापीठाच्या सर्वाधिक पायाभूत सुविधा याच दिशेने निर्माण झाल्या. त्यात मूलभूत विज्ञान संस्था, पदव्युत्तर शिक्षण संस्था, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, विद्यापीठ ग्रंथालय, प्रशासकीय इमारत, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र, पीएच.डी. होस्टेल,कपाशी, तेलबिया, बीज तंत्रज्ञान संशोधन केंद्राची कार्यालये, प्रयोगशाळा त्याचप्रमाणे वनस्पतीशास्त्र, रोगशास्त्र, कीटकशास्त्र आणि माळी प्रशिक्षणाच्या क्षेत्रीय प्रयोगशाळा याच भागात विकसित करण्यात आल्या. या बाजूने विस्तारीकरण झाल्यास एकूणच संशोधन, शिक्षण व बियाणे निर्मितीवर विपरीत परिणाम अटळ आहे.
कृषी विद्यापीठ प्रक्षेत्र आणि शिक्षण, संशोधन, प्रशासन कार्यालये, संस्था विभागली जाणार आहे. विद्याशाखांच्या इमारतींना अगदी लागूनच असलेल्या विमानतळाच्या भिंतीमुळे परिसर विद्रुप होण्याची शक्यता आहे. शिवणी विमानतळ आधीच शहराने वेढले गेले आहे. विमानतळासाठी भविष्यातील विकासाकरिता जागा उपलब्ध नसेल. 400 मीटरच्या धावपट्टी विकासासाठी विमानतळाची सध्या उपलब्ध असलेल्या जमिनीपेक्षा 79.3 हेक्टर अधिक म्हणजे 94.8 हेक्टर जमिनीची मागणी आहे. या प्रस्तावामुळे सुमारे 34.1 हेक्टर खासगी कृषी आणि अकृषक जमीन तसेच 100 खासगी घरेसुद्धा नष्ट होणार आहेत. विमानतळ व्हावे हा अट्टहास लोकप्रतिनिधींचा सुरू असला, तरी त्यांनी विद्यापीठाच्या बाजूनेही विचार करावा, असा आग्रह माजी कुलगुरूंनी धरला आहे.
पूर्वेकडील भागाचा विचार व्हावा
कृषी विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या विमानतळाच्या पूर्वेकडील भागाचा विस्तारीकरणासाठी विचार केल्यास अधिक सोयीचे होईल. विमानतळही होईल आणि विद्यापीठ व शहराचेही कोणते नुकसान होणार नाही.’’ डॉ. बळवंत बथकल, माजी कुलगुरू
माजी कुलगुरू एकत्र :डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. विठ्ठल रहाटे, डॉ. बळवंत बथकल, डॉ. गोविंद भराड व डॉ. शरद निंबाळकर हे चार माजी कुलगुरू एकत्र आले आहे. शिवणी विमानतळाच्या विरोधासाठी नव्हे, तर विद्यापीठाची कोट्यवधींची जागा वाचवण्यासाठी व जनतेच्या हितासाठी एका व्यासपीठावर येऊन विदर्भ कृषी विकास मंचाने सुरू केलेल्या लढय़ात सहभागी होण्याचे या मान्यवरांनी ठरवले आहे.
सोलापूर पॅटर्न अवलंबावा
तांत्रिकदृष्ट्या योग्य वाटत असल्यास सध्याचे विमानतळाचा विस्तार न करता नवीन जागेचा म्हणजे विमानतळ स्थानांतरणाचा विचार व्हावा. असे स्थानांतरण सोलापूर विमानतळाच्या धर्तीवर सहज शक्य आहे.’’ प्रा. राजाभाऊ देशमुख, विदर्भ कृषी विकास मंच.