आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्याच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून दिला बारावीचा पेपर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- वेळ मध्य रात्रीची. दुसऱ्या दिवशी बारावीचा पेपर असल्याने एकाच वर्गात असलेले दोघे चुलत भाऊ उशिरापर्यंत अभ्यास करत होते. अचानक रात्री १२.३० वाजता त्यांच्यापैकी एकाचे वडील आणि दुसऱ्याचे काका असलेले अजाबराव गंगाराम उपर्वट (४९) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे आभाळाएवढे दु:ख कोसळले. परंतु, दोघाही भावांनी स्वत:ला सावरत अंत्यसंस्काराला जाण्याऐवजी परीक्षेला प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांचे कौतुक हाेत आहे. ही धैर्य कथा आहे देऊळगाव (ता. पातूर) येथील आकाश आणि विकास या चुलत भावंडांची.

आकाश आणि विकास हे समवयस्क. शाळेतही सोबतच. निधन झालेले अजाबराव हे आकाश याचे वडील, तर विकास याचे काका होते. १५ मार्चला त्यांचा इयत्ता बारावीचा पेपर होता. त्यामुळे १४ मार्चच्या रात्री उशिरापर्यंत ते अभ्यास करत होते. पण, अचानक अजाबराव यांचे निधन झाले आणि घरात एकच कल्लोळ झाला. रडारड सुरू झाली. आकाश आणि विकास यांनाही काय करावे सुचत नव्हते. परंतु, अजाबराव यांचे लहान बंधू प्रजानंद यांनी त्यांच्या मनातील घालमेल ओळखली. प्रजानंद यांनी त्या दोघांना धीर दिला आणि जे झाले तो भूतकाळ आहे. तो आता कधीच परत येणार नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी असलेला बारावीचा पेपर हा भविष्यकाळ आहे. त्यामुळे तुमच्या काका आणि वडिलांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल, तर परीक्षा द्यायला जा, असे समजावून सांगितले. डबडबलेल्या डोळ्यांनी काळजावर दगड ठेवून आकाश आणि विकास परीक्षेसाठी तयार झाले. घरात एकाच्या बाबाचा, तर दुसऱ्याच्या काकाचा मृतदेह होता. अशातच त्यांनी त्यांच्या पायाला स्पर्श करत अंत्यसंस्काराऐवजी ११ ते या वेळेत परीक्षा दिली. याच वेळेत इकडे अंत्यसंस्कार झाला.

हीच खरी श्रद्धांजली
आपल्याजवळच्या व्यक्तीचे जाणे हे प्रत्येकालाच चटका लावून जाते. त्यामुळे दु:ख होणे स्वाभाविक आहे. असे असताना ते गेले त्यांचा विचार काही क्षण बाजूला ठेवून जे आहेत त्यांच्या आयुष्याचा विचार करणे गरजेचे आहे. हीच आपल्या लाडक्या व्यक्तीला खरी श्रद्धांजली ठरणार आहे, हाच विचार आकाश आणि विकासने कृतीतून दिला.