आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसा वेल्डिंगचे काम अन् रात्र शाळेत घेतले शिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अजय सावंत)
अकोला- घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असूनही शिक्षणाची आवड असल्याने, रात्र शाळेत प्रवेश घेतला. दिवसभर वेल्डिंग, पेंटिंगचे काम करायचे आणि रात्री शाळेत शिकायचे, असा दिनक्रम असणाऱ्या अजय शंकर सावंत याने दहावीत ७६.६० टक्के प्राप्त केले.
पुढील शिक्षण औरंगाबादला मामाकडे घेणार असून, त्याला आर्मी, नेव्हीमध्ये जाण्याची इच्छा आहे. पंचशीलनगरात राहणारा अजय सावंत हा त्याचे मोठे बाबा सुरेश सावंत यांच्यासोबत पेंटिंगचे काम करतो, तर हे काम नसल्यामुळे वेल्डिंग वर्क्स येथे वेल्डिंगचे काम करतो. सकाळी १० ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उदरनिर्वाहासाठी काम करायचे आणि सायंकाळी ते रात्री १० वाजेपर्यंत शिक्षणाची भूक भागवायची, असा त्याचा नियमित दिनक्रम होता. शिकायचे आणि भविष्यात देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय सैन्य दल किंवा भारतीय नौदल यात जाण्याचा त्याचा मानस आहे. त्यासाठी तो सतत धडपडत आहे. अजयचे इयत्ता दुसरी ते सहावीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्याचे वडील ठेकेदार होते आणि ते पुण्यात पेंटिंगचे काम करायचे.
मागील चार वर्षांपूर्वी वडिलांचे टीबीने निधन झाले. त्यानंतर त्याचे कुटुंब अकोल्याला परतले.
घरी आई, उज्ज्वलाताई सध्या राजगिरा लाडू बनवण्याच्या कारखान्यात काम करते, तर मोठा भाऊ यशवंत कपड्याच्या दुकानात काम करतो. घराचा खर्च निघण्यासाठी मागच्या वर्षीपासून अजयनेही कामाला सुरुवात केली. त्यामुळे दिवसा शाळेत जाणे शक्य नव्हते. पण, अभ्यासाचा नाद सुटणे अवघड असल्याने त्याने रात्र शाळेत प्रवेश घेतला.