आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्धार मेळावा - हलगर्जीपणा करणा-या बँकांवर फौजदारी - अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील शेतक-यांची पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. येत्या सात दिवसांत ती शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. तसेच ज्या बँका पीक विम्याबाबत हलगर्जीपणा करतील, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करू, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. रविवारी रामदासपेठ येथील मराठा मंडळ सभागृहात आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, जिल्हा परिषद, महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून लोकांना चांगल्या सेवा मिळत नाहीत. जिल्ह्यात पाणी आहे, पण वितरण व्यवस्था नाही. दोन दिवसांनी लोकांना पाणी पुरवल्या जाते. त्यासाठी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे देण्याच्या सूचना आपण मजिप्राच्या अधिका-यांना दिल्या आहेत. त्यासाठी साडेअकरा कोटी रुपये देऊन शहराला रोज पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून, शहराला रोज पाणीपुरवठा मिळावा यासाठी बुधवारी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार आहे. शहरामध्ये बेकायदेशीर नळ कनेक्शन आहेत, त्यासाठी प्रत्येकाने आर्थिक शिस्त लावणे गरजेचे आहे. या निर्धार मेळाव्याला राष्ट्र वादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, संपर्कमंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार कृष्णराव इंगळे, माजी मंत्री वसंतराव धोत्रे, माजी आमदार तुकाराम बिडकर, जिल्हाध्यक्ष श्रीकांत पिसे, माजी जिल्हाध्यक्ष संतोष कोरपे, महानगराध्यक्ष अजय तापडिया, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, आशा मिरगे, हृषीकेश पोहरे, नीरज खोसला, संगीता पाटील, सचिन वाकोडे आदींची उपस्थिती होती.

भाववाढ करून मोदी सरकारने जनतेचा केला भ्रमनिरास
मोदी सरकारने शेतक-यांची थट्टा चालवली आहे. शेतमालाच्या आधारभूत किमती कधी नव्हे त्या केवळ 50 रुपयांनी वाढवून दिल्या आहेत. एका महिन्यातच रेल्वे, गॅस, खत, सिमेंट आदींचे भाव वाढवून त्यांनी लोकांचा भ्रमनिरास केला आहे. तीन राज्यांच्या निवडणुका असल्यामुळे सध्या भाववाढ थांबली आहे. निवडणुका होऊ द्या आणि नंतर बघा, अशी भविष्यवाणीही अजित पवार यांनी केली. मोदी सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात लोकांना गाव पारावर जाऊन सांगा, असे आदेशही त्यांनी मेळाव्यात उपस्थित असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिका-यांना यावेळी दिले.

जिल्हाधिका-यांवर कारवाई, मुख्य सचिवांना सांगणार
जिल्हाधिकारी अरुण शिंदेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ते चंद्रपूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना अपहाराचे गंभीर आरोपांमुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले. त्यासंदर्भात पवार म्हणाले की, मुख्य सचिवांच्या कानावर ही बाब उद्याच टाकणार आहे. अधिका-यांवर कारवाईसाठी काही सूत्र केंद्राने ठरवून दिले आहेत. मात्र, अ‍ॅक्शन राज्य सरकारला घेता येते. अ‍ॅक्शन घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. कायदा व सुव्यवस्था ढासळल्याची बाबही गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कानावर घालू, असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

प्रतिमा डागाळलेल्या पदाधिका-यांना पदे देऊ नका
निवडणुकीसाठी कार्यकर्ता तयार असला पाहिजे. घोषणा देऊन भागणार नाही, त्यासाठी कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील प्रतिनिधी विधानसभेत पाठवला पाहिजे. तुकाराम बिडकरांनंतर जिल्ह्यातील एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. जिल्ह्यात आणखी एक जागा वाढवून घेण्याचा प्रयत्न आहे. एकमेकांचे पाय खेचायचे काम करू नका, कुटुंब म्हणून काम करा. ज्यांची जनमानसात प्रतिमा डागाळली आहे, त्यांना पद देऊ नका. कारण त्यामुळे पक्षाची बदनामी होते. तिकीट एकालाच मिळणार आहे. ताकदीचे उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. सर्वांनी एकदिलाने पक्षाची भूमिका लोकांसमोर मांडावी, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौ-यामुळे नेहरू पार्क चौकात दुपारी 2 च्या सुमारास अर्धा तास वाहतूक अडवण्यात आली. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनाचा ताफा शिवणी विमानतळाकडे रवाना झाल्यानंतरही या चौकातील वाहतूक सुरू करण्यात आली नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 3 जुलैला अकोला दौरा होता. उपमुख्यमंत्र्यांच्या दौ-यामुळे शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर अजित पवार शिवणी विमानतळाकडे रवाना झाले. या वेळी रतनलाल प्लॉट चौक, सिव्हिल लाइन्Þा चौक व नेहरू पार्क चौकातील वाहतूक अडवण्यात आली. नेहरू पार्क चौकात अशोक वाटिकेकडून तसेच नेहरू पार्क चौकाकडून येणारी वाहतूक रोखली होती.