आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी पँथरने अकोल्यात अजित पवारांचा ताफा रोखला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यासाठी रविवारी अकोल्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा आदिवासी पॅँथरच्या कार्यकर्त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. राज्य शासन आदिवासी प्रवर्गामध्ये नव्या जातींचा समावेश करण्याचा घाट घालत असल्याचा निषेध करत या कार्यकर्त्यांनी आरक्षण बचावार्थ घोषणाबाजीही केली.

धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करावे, या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. तर दुसरीकडे आदिवासी समाजाला आता ‘एनटी’ प्रवर्गात कोणत्याही जातीचा समावेश नको आहे. इतर जातींचा समावेश केल्यास आदिवासी समाजावर अन्याय होईल, असे अदिवासी पँथरचे म्हणणे आहे. त्यासाठीही विरोधात आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौर्‍याचे निमित्त साधून आदिवासी पँथरचे कार्यकर्ते शहरातील अशोक वाटिकेजवळ पवार यांना मागणीचे निवेदन देण्यासाठी जमले होते. परंतु पवारांचा ताफा थांबला नाही. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करून घोषणाबाजी केली.

या प्रकारामुळे पोलिसही गोंधळून गेले, मात्र काही वेळातच त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले व ताफा रवाना झाला. त्यानंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली.

समाजावर अन्याय
धनगर समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण आहे, खुल्या प्रवर्गातही त्यांना लाभ घेता येतो. आता आदिवासी प्रवर्गात आरक्षण दिल्यास आदिवासी समाजावर अन्याय होईल. त्यामुळेच आमचा धनगर समाजाच्या आदिवासी प्रवर्गातील आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळेच आम्ही उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला तसेच पाच ऑगस्टला मोर्चाही काढण्यात येणार आहे, असे कार्याध्यक्ष गजानन चव्हाण यांनी सांगितले.